एक जुनी म्हण आहे, वेळ बलवान आहे. वेळ किती बलवान आहे? एक-एक मिनिटाची किंमत काय? हे तेव्हाच कळतं, जेव्हा एखादा माणूस काही क्षण, सेकंद आणि काही मिनिटांमुळे आपल्या लक्ष्यापासून चुकतो. ताजी घटना महाराष्ट्र निवडणुकीशी संबंधित आहे. एका मिनिटाची किंमत काय असते, हे कोणी नागपूरच्या अनिस अहमद यांना विचारा. मध्य नागपूरच्या विधानसभा जागेवरुन प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन अघाडीने अनिस यांना उमेदवारी दिली होती. पण एक मिनिट उशिर झाल्यामुळे ते उमेदवारी अर्ज दाखल करु शकले नाहीत. माजी आमदार आणि माजी मंत्री अनिस अहमद हे काँग्रेसकडून तिकीटासाठी दावेदार होते. काँग्रेसकडून तिकीट मिळालं नाही, तेव्हा अनिस यांनी हाताची साथ सोडून वंचिकडून तिकीट मिळवलं.
वंचितकडून तिकीट मिळाल्यानंतर अनिस अहमद उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचले. काल उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. अनिस अहमद यांनी सर्व औपचारिकता, प्रक्रिया पूर्ण केल्या. ते नामांकन दाखल करण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्याजवळ पोहोचले, तेव्हा तीन वाजून एक मिनिट झालेला. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ तीन वाजेपर्यंत होती.
काय म्हणाले अनिस अहमद?
या एका मिनिट उशिराचा हवाला देत निवडणूक अधिकाऱ्याने हॉल बंद केला. अनिस अहमद निवडणूक अर्ज दाखल करु शकले नाहीत. निवडणूक जिंकून आमदार बनून विधानसभेत जाण्याच त्यांचं स्वप्न मोडलं. अनिस यांनी या सर्व प्रकरणासाठी प्रशासनाला जबाबदार धरलं आहे. मी तीन वाजण्याआधी आत गेलो होतो, असं अनिस यानी म्हटलं आहे. “माझा माणूस आत बसला होता. त्याला टोकन नंबर आठ देण्यात आला होता. माझा माणूस आतमध्ये बसलेला असतानाही मला जाऊ दिलं नाही. तीन वाजण्याआधी मेन गेट, सेमी गेट आणि सब दरवाजा पार करुन आतमध्ये आलेलो. पण अधिकाऱ्यांनी मला आत जाऊ दिलं नाही” असं अनिस अहमद म्हणाले.