येत्या 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात एका टप्प्यातच निवडणुका होणार आहेत. एकूण 288 जागांवर मतं टाकली जाणार आहेत. त्यानंतर अवघ्या तीन दिवसात म्हणजे 23 नोव्हेंबर रोजी निकाल येणार आहेत. त्यामुळे या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. नुकत्याच लोकसभा निवडणुका झाल्या. त्यातील आकडेवारी पाहता विदर्भात काँग्रेसचा दबदबा असल्याचं दिसून आलं आहे. तर उत्तर महाराष्ट्रात भाजपला पर्याय नसल्याचं अधोरेखित झालं आहे. इतर भागात काय परिस्थिती आहे? आकडे काय सांगतात? यावर टाकलेला हा प्रकाश…
महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा आहेत. बहुमतासाठी 145 जागांची गरज आहे. विदर्भात एकूण 62 जागा आहेत. त्यापैकी भाजपचे 15, शिंदे गटाचे 4, काँग्रेसचे 29, शरद पवार गटाचे 5, ठाकरे गटाचे 8 आणि एका जागेवर अन्य आमदार निवडून आलेले आहेत. पश्चिम महाराष्ट्रात एकूण 70 जागा आहेत. त्यापैकी भाजपकडे 17, शिंदे गटाकडे 11, अजितदादा गटाकडे 2, काँग्रेसकडे 10, शरद पवार गटाकडे 19, उद्धव ठाकरे गटालाकडे 6 तर इतरांकडे 5 जागा आहेत.
उत्तर महाराष्ट्रात एकूण 35 जागा आहेत. त्यातील 20 जागा भाजपकडे आहेत. शिंदे गटाकडे दोन, काँग्रेसकडे 5, शरद पवार गटाकडे 4 आणि ठाकरे गटाकडे 4 जागा आहेत. उत्तर महाराष्ट्रात अजितदादा गटाचा एकही आमदार नाही. मराठवाड्यात एकूण 46 जागा आहेत. त्यात भाजपकडे 8, शिंदे गटाकडे 4, काँग्रेसकडे 14, शरद पवार गटाकडे 3, ठाकरे गटाकडे 15 आणि इतरांकडे दोन जागा आहेत. मराठवाड्यातही अजितदादा गटाचं अस्तित्व नाहीये.
ठाणे आणि कोकणात मिळून एकूण 39 जागा आहेत. या ठिकाणी भाजपकडे 11, शिंदे गटाकडे 12, अजितदाद गटाकडे 4, शरद पवार गटाकडे दोन, ठाकरे गटाकडे 9 आणि इतरांकडे एक जागा आहे. ठाणे आणि कोकणात काँग्रेसचं अस्तित्वच नाहीये. दुसरीकडे मुंबईत एकूण 36 जागा आहेत. मुंबईत भाजपकडे 9, शिंदे गटाकडे 7, काँग्रेसकडे 5, ठाकरे गटाकडे 15 जागा आहेत. विशेष म्हणजे मुंबईत काँग्रेस, अजितदादा आणि शरद पवार गटाचं अस्तित्व नाहीये.
मागच्या म्हणजे 2014च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 122 जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसला 42, एनसीपीला 41 आणि शिवसेनेला 63 जागा मिळाल्या होत्या. तर अन्य 20 जण निवडून आले होते. त्यानंतर 2019मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 105, काँग्रेसला 44, एनसीपीला 54 आणि शिवसेनेला 56 जागा मिळाल्या होत्या. इतरांना यावेळी 29 जागा मिळाल्या होत्या.