मुंबईः विधानसभेचं विशेष अधिवेशनात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश राज्यपालांनी दिले आहेत. याच अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची (Assembly Speaker Election) निवडणूक होत आहे. शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनिल प्रभू (Sunil Prabhu) यांनी शिवसेनेच्या सर्व आमदारांना यासंबंधीचा व्हीप जारी केला आहे. शिवसेनेचे विधानसभा अध्यक्षपदासाठीचे उमेदवार राजन साळवी यांनाच मतदान करण्याचे आदेश प्रभू यांनी दिले आहेत. आता बंडखोर एकनाथ शिंदे गटातील आमदार हा व्हीप मानणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. रविवारी विधानसभा अध्यक्षपदासाठीची निवडणूक होणार असून बंडखोर आमदार नेमकी कोणती भूमिका घेतील, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
बंडखोर एकनाथ शिंदे यांना शिवसेनेने नुकतेच पक्षनेते पदावरून हकालपट्टी करण्यात आल्याचे पत्र पाठवले आहे. त्यातच एकनाथ शिंदे यांना गटनेते पदावरून काढल्यानंतर शिवसेनेने अजय चौधरी यांची गटनेते पदी नियुक्ती केली आहे. शिवसेनेच्या अजय चौधरींच्या नियुक्तीला शिंदे गटाने विरोध केला आहे. शिंदे गट अजूनही आम्हीच खरी शिवसेना असल्याचा दावा करतंय, मात्र अधिकृतरित्या अजूनही उद्धव ठाकरे हेच शिवसेना प्रमुख आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे गट आता पक्षादेश मानणार तो कुणाचा असा प्रश्न निर्माण झालाय.
विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपने कुलाब्याचे आमदार राहुल नार्वेकर यांना उमेदवारी दिली आहे. पूर्वी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले नार्वेकर हे भाजप आमदारांच्या पाठिंब्याने विधानसभा अध्यक्षपदी निवडून आले तर हे सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष असतील. महाविकास आघाडीतर्फे राजन साळवी यांचा अर्ज दाखल करण्यात आला आहे. शिवसेनेचे कोकणातील सामान्य कुटुंबातील हे आमदार आहेत. तर राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे हे सूचक तर काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे हे अनुमोदक झाले आहेत.
महाविकास आघाडी सरकारमध्ये नाना पटोले यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी निवड झाल्यानंतर त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर मविआने अनेकदा ही निवडणूक घेण्यासाठी प्रयत्न केले. मात्र राज्यपालांनी तांत्रिक कारणे दाखवत ही निवडणूक लांबवल्याचा आरोप मविआ सरकारने केला आहे. त्यामुळे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ हे अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडत होते. आता भाजपच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर राज्यपालांनी तत्काळ ही निवडणूक लावली आहे. मात्र शिवसेनेत दोन गट पडल्याने बंडखोर आमदार पक्षादेश पाळतात की नाही, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.