मुंबई: तब्बल एक महिन्यानंतर अखेर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) होणार आहे. उद्या 9 ऑगस्ट रोजी शिंदे-फडणवीस सरकारचा (maharashtra government) मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. हा संपूर्ण विस्तार असणार नाही. पण पहिल्या टप्प्यातील विस्तार असणार आहे. या पहिल्या टप्प्यात साधारण 12 मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. त्यामुळे या मंत्रिमंडळात कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच येत्या 10 ते 17 ऑगस्ट दरम्यान राज्याचं पावसाळी अधिवेशन (monsoon session) पार पडणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली. त्यामुळे या अधिवेशनापूर्वीच म्हणजे उद्याच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. उद्या मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर संध्याकाळीच मंत्र्यांना खाते देण्यात येणार आहे. त्यानंतर बुधवारी कॅबिनेटची बैठकही होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
उद्या 9 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. यावेळी एकूण 12 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यात भाजपच्या 8 आणि शिंदे गटाच्या 7 आमदारांचा समावेश असणार असल्याचं सांगितलं जात आहे. शिंदे गटाकडून माजी मंत्र्यांना आधी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. तर भाजपकडून विधानसभेतील आमदारांना आधी संधी दिली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, शपथविधीच्या दिवशीच नेमकं चित्रं स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, विधान भवनाबाहेर अचानक पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तसेच विधान भवनात जाण्यास मज्जाव केला जात आहे. एक दोन दिवसात मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याने चेकींग करण्यात येत असल्याचं पोलिसांनी सांगितलं. त्यामुळे कोर्टाच्या निकालाआधीच शिंदे-फडणवीस सरकारचा शपथविधी होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला त्यांच्या नंदनवन निवासस्थानी गेले. यावेळी रामदास कदमही उपस्थित होते. या तिन्ही नेत्यांमध्ये सुमारे पाऊणतास चर्चा झाली. यावेळी मंत्रिमंडळाच्या यादीवरून शेवटचा हात फिरवण्यात आल्याचं सांगण्यात येतं.
दरम्यान, विधीमंडळ सचिवांची आज बैठक पार पडली. यावेळी राज्याच्या पावसाळी अधिवेशनावर चर्चा झाली. तसेच तयारीचा आढावाही घेण्यात आला. राज्याचे पावसाळी अधिवेशन येत्या 10 ते 17 ऑगस्टपर्यंत घेण्याचं या बैठकीत ठरल्याचं सांगण्यात येतं. दरम्यान, कोरोना नसतानाही अधिवेशन अवघ्या सात दिवसांचं होणार असल्याने त्याला विरोधकांकडून कडाडून विरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी येत्या दोन दिवसात मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याचं सांगितलं. मी मंत्रीपदी नसेल आणि कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसणार आहे, अशी माहितीही रामदास कदम यांनी दिली.