T20 वर्ल्ड कप विजेत्या टीम इंडियाचा काल महाराष्ट्र विधान भवनात सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्ल्ड कप विजेत्या टीमसाठी 11 कोटी रुपये इनामी रक्कमेची घोषणा केली. यावरुन आता राजकारण रंगायला सुरुवात झाली आहे. विरोधी पक्षांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या निर्णयावर टीका केली आहे. राज्याच्या तिजोरीत खडखडाट असताना 11 कोटी रुपये देण्याची गरज नव्हती असं विरोधी पक्षांनी म्हटलं आहे. “टीम इंडियाला आता 11 कोटी रुपये देण्याची गरज होती का?. खेळाडू देशासाठी खेळतात. 120 कोटी रुपये बीसीसीआयने दिल आहेत. एवढी मोठी रक्कम इनाम म्हणून दिल्यावर स्वत:च्या तिजोरीतून पैसे द्यायची काय गरज होती?” असा सवाल राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विचारला.
“क्रिकेटमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा आहे. आयपीएल वैगेर हे पैशासाठीच आहे. त्यातून बराच पैसा मिळतो. क्रिकेटपटुंचा आदर केला पाहिजे, यात काही शंका नाही. पण एवढा मोठा निधी राज्याच्या तिजोरीतून देण्याची काय गरज होती? एवढच होतं, तर मुख्यमंत्र्यांनी स्वत:च्या खिशातून द्यायच होतं” अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केली.
मुख्यमंत्री म्हणाले, आम्ही दोन वर्षांपूर्वी काढलेली विकेटही कोणी नाही विसरणार
काल विधान भवनात टीम इंडियातील मुंबईच्या खेळाडूंचा सत्कार करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार बॅटिंग केली. “राजकारण क्रिकेटसारख आहे, कधी कोण कोणाची विकेट घेईल सांगता येत नाही. सूर्यकुमारजी तुमचा कॅच कधीच कोणी विसरणार नाही, तसच आमच्या 50 जणांच्या टीमने दोन वर्षांपूर्वी काढलेली विकेटही कधी कोणी विसरणार नाही” असं मुख्यमंत्र्यांनी म्हणताच हॉलमध्ये एकच हंशा पिकला.