महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज गुढी पाडवा मेळावा होणार आहे. दादरच्या शिवाजी पार्क मैदानात भव्य सभा पार पाडणार आहे. सध्या देशात लोकसभा निवडणुकीची धामधूम आहे. महाराष्ट्रातही प्रचाराला सुरुवात झाली आहे. या सगळ्या राजकीय धामधुमीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका काय असणार? ते अजून स्पष्ट झालेलं नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज काय भूमिका जाहीर करणार? भाजपा नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर त्यांची काय चर्चा झाली? त्या बद्दल ते काय बोलतात, याकडे महाराष्ट्र सैनिकांसह राजकीय विश्लेषकांच लक्ष लागलं आहे. महायुतीमधले नेते राज ठाकरे सोबत आले तर आनंदच आहे, राज ठाकरे यांनी सोबत यावं, अशी इच्छा व्यक्त करत आहेत. पण प्रत्यक्षात मनसेने महायुतीमध्ये सहभागी व्हाव, अशा घडामोडी घडताना दिसत नाहीयत. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज हा सस्पेन्स संपवतील अशी अपेक्षा आहे.
मनसे लोकसभा निवडणूक 2024 लढवणार का? मनसे, शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी महायुतीमध्ये सहभागी होणार का? मनसे बाहेर राहून महायुतीला पाठिंबा देणार का? मनसे महायुतीमध्ये गेल्यास किती जागा मिळणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज मिळणार आहेत. मनसेच्या भविष्याच्या दृष्टीने राज ठाकरे आज काय भूमिका घेतात? ते महत्त्वाच आहे. मागच्या महिन्यात राज ठाकरे दिल्लीत जाऊन अमित शाह यांना भेटले, त्यावेळी राज ठाकरे महायुतीमध्ये सहभागी होणार अशा चर्चा सुरु झालेल्या. पण आता या चर्चा थंडावल्या आहेत.
श्रीकांत शिंदे काय म्हणाले?
आज मनसेचा गुढी पाडवा मेळावा आहे. त्यात राज ठाकरे काय बोलतात? याकडे सगळ्यांचच लक्ष आहे. या मेळाव्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र श्रीकांत शिंदे यांनी महायुतीमध्ये मनसेच्या सहभागा संदर्भात सूचक वक्तव्य केलं आहे. “मला वाटत हा वरिष्ठेच्या चर्चेचा विषय आहे. त्या ठिकाणी मी जास्त भाष्य करु शकत नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री स्वत: राज साहेब बोलतील. ते महायुतीमध्ये आले, तर आनंदच आहे. एकविचारी, समविचारी पक्ष एकत्र आले तर लोक भरुभरन मतदान करतील. अजून चांगली काम होतील” असं श्रीकांत शिंदे म्हणाले.