महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ड्रामा… दिल्लीपासून दरे गावापर्यंत, कोणत्या दिवशी काय घडलं?; वाचा A टू Z अपडेट

| Updated on: Dec 01, 2024 | 11:31 AM

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले आहे. पण मुख्यमंत्रीपदावरून एकनाथ शिंदे आणि भाजपमध्ये वाद निर्माण झाला आहे. शिंदे यांनी मुख्यमंत्रीपद न मिळाल्यास उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्रीपद मागितले आहेत. यामुळे सरकारचा शपथविधी झाला नाही. भाजपने एकतर्फीपणे शपथविधीची तारीख जाहीर केल्याने राजकीय तणाव वाढला आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ड्रामा... दिल्लीपासून दरे गावापर्यंत, कोणत्या दिवशी काय घडलं?; वाचा A टू Z अपडेट
eknath shinde
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळालं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महायुतीचंच सरकार येणार असल्याचं स्पष्ट झालं. पण मुख्यमंत्रीपद मिळणार नसल्याने एकनाथ शिंदे यांनी थेट नाराजी दर्शवल्याने महायुतीच्या सरकार स्थापनेत मोठा अडसर निर्माण झाला आहे. शिंदेंच्या नाराजीमुळे सात दिवस झाले तरी अद्याप सरकार स्थापन होऊ शकलं नाही. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपद मिळणार नसेल तर उपमुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्रीपद देण्याची मागणी केली आहे. मी मुख्यमंत्रीपद असताना ही दोन्हीपदे भाजपकडे होती. तीच आता आमच्याकडे यावीत, असं एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना सांगितल्याचं समजतं. त्यामुळे सरकार स्थापनेचं घोडं अडल्याचं सांगितलं जात आहे.

हा मानापमानाचा राजकीय ड्रामा सुरू असतानाच भाजपने मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीची तारीख जाहीर केली आहे. एकनाथ शिंदे यांच्याशी कोणतीही चर्चा न करता ही तारीख जाहीर केल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे शिंदे यांना द्यायचा तो सूचक इशारा भाजपने दिल्याचं सांगितलं जात आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राज्यात अनेक घडामोडी घडल्या. दिल्लीपासून दरेगावापर्यंत अनेक घटना घडल्या आहेत. मागणी, हट्ट, नाराजी आणि मनधरणी… या भोवतीच राजकारण फिरत राहिलं आहे. कोणत्या दिवशी काय घडलं? याचीच माहिती आपण घेणार आहोत.

23 नोव्हेंबर 2024

23 नोव्हेंबर रोजी निवडणुकीचे निकाल आले. महायुतीने प्रचंड बहुमत मिळवलं. भाजपला सर्वाधिक 132 जागा मिळाल्या. शिंदे गटाला 57 आणि अजितदादा गटाला 41 जागा मिळाल्या. महाविकास आघाडीला फक्त 46 जागा मिळाल्या. शरद पवार गटाला 10, काँग्रेसला 16 आणि ठाकरे गटाला 20 जागा मिळाल्या आहेत.

23 नोव्हेंबर 2024

या निकालानंतर शनिवारी रात्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरला गेले. त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत आणि संघ पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर मोहन भागवत यांनी मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीस यांच्या नावाला संमती दर्शवल्याचं सांगितलं जात आहे.

23 नोव्हेंबर 2024

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार या महाराष्ट्रातील तीन महत्त्वाच्या नेत्यांशी फोनवर चर्चा केली. त्यांचं अभिनंदन केलं आणि महाराष्ट्राच्या विकासावर जोर दिला.

23 नोव्हेंबर 2024

अजितदादा गटाकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा. कोणतीही अट शर्त ठेवली नाही.

24 नोव्हेंबर 2024

मुंबईत 24 नोव्हेंबर रोजी शिंदे गटाची बैठक झाली. यावेळी एकनाथ शिंदे यांची सर्व संमतीने नेता म्हणून निवड करण्यात आली.

26 नोव्हेंबर 2024

एकनाथ शिंदे यांनी 26 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. सोबतच त्यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळाने राजीनामा दिला. काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून शिंदे यांच्याकडे कार्यभार सोपवला गेला.

28 नोव्हेंबर 2024

एकनाथ शिंदे यांनी 28 नोव्हेंबर रोजी रात्री दिल्लीत अमित शाह आणि जेपी नड्डा यांच्याशी बैठक केली. यावेळी शिंदे यांनी गृहमंत्रीपदाची मागणी केल्याचं सांगितलं जात आहे.

29 नोव्हेंबर 2024

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी संध्याकाळी (29 नोव्हेंबर 2024) यांनी महायुतीची बैठक रद्द केली आणि अचानक साताऱ्यातील आपल्या दरे गावी निघून गेले. तब्येत खराब असल्याने गावाला गेल्याचं त्यांनी सांगितलं.

30 नोव्हेंबर 2024

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी 30 नोव्हेंबर रोजी एक्स अकाऊंटवरून शपथविधी समारंभाची माहिती दिली. 5 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजता आझाद मैदानावर नव्या सरकारचा शपथविधी होणरा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह या सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याचं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं.

30 नोव्हेंबर 2024

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपलाच मुख्यमंत्रीपद मिळावं असं म्हटलं. फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्रीपद दिलं जावं असं त्यांना सूचवायचं होतं.