मुंबई : राज्यात भाजप मनसे संभाव्य युतीची जोरदार चर्चा आहे. जि.प.परिषद आणि महापालिका निवडणुकीत मनसे-भाजप संसार थाटण्याची शक्यताही आहे. पालघरमध्ये मनसे भाजप युतीचा नारळही फुटलाय. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी काहीशी खोचक कमेंट केली. जातीयवादी पक्ष एकत्र आले तरी काँग्रेसला फरक पडणार नाही, अशा शब्दात त्यांनी संभाव्य युतीवर टीका केली.
महापालिका आणि जि.प. परिषद निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. विविध पक्षांच्या बैठका पार पडायला सुरुवात झाली आहे. रणनिती आखायलाही सुरुवात झाली आहे. याच सगळ्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी नाना पटोले यांना प्रश्न विचारला असता त्यांनी खोचक भाष्य केलं. जातीयवादी पक्ष एकत्र आले तरी काँग्रेसला फरक पडणार नाही, असं ते म्हणाले.
देशातील विविध राज्यात शिवसेना निवडणूक लढवत आहेत. शिवसेना हा आमचा महाराष्ट्रात मित्र पक्ष आहे. त्यांच्या पक्षाच्या निर्णयानुसार जर गोव्यामध्ये शिवसेना निवडणूक लढवत असेल तर त्यांच्या निर्णयाचे स्वागतच आहे, असंही पटोले म्हणाले.
परमवीर सिंग गेल्या काही दिवसांपासून फरार आहेत. अनेक प्रयत्न करुनही त्यांचा पत्ता पोलिसांना आणि तपास अधिकाऱ्यांना कळालेला नाहीय. आमचा स्पष्ट आरोप आहे की त्यांना देशाबाहेर फरार करण्यामध्ये केंद्राचा हात आहे, असा गंभीर आरोप पटोले यांनी केला.
केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे भाजपचे सरकार अपयशी ठरलं. या मुद्द्यांपासून भरकटवण्यासाठी ईडीचा वापर केला जात आहे. परमवीर सिंग हे त्यावेळी मुंबई पोलीस कमिशनर होते त्यांना त्या काळातच कारवाई झाली असती तर हा जो घोटाळा बोलला जातोय त्याचा मूळ उद्देश काय आहे तो समोर आला असता, मात्र राजकीय द्वेषापोटी आता महाराष्ट्रावर कारवाई केली जाते. हे सरकार डळमळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.
जलयुक्त शिवारमुळे मराठवाड्यात पूरपरिस्थिती आली, असा दावा ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ अतुल देऊळगावकर यांनी केलाय. यावर बोलताना पटोले म्हणाले, “पर्यावरण तज्ञ देऊळगावकर कोणत्या निकषांच्या आधारावर हे असं वक्तव्य करत आहेत मला माहित नाही. मात्र कॅगने जलयुक्त शिवार च्या रिपोर्ट वरच ठपका ठेवला होता. त्यामुळे ते काम पूर्ण झालं होतं की नाही हा एक प्रश्न आहे. मात्र मी मराठवाड्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा करून आलो आणि त्या परिस्थितीच्या आधारावरच राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून सर्वतोपरी मदत शेतकऱ्यांना करावी अशी काँग्रेसची मागणी आहे.”
पंतप्रधानांनी मागील चक्रीवादळाच्या दरम्यान देखील गुजरातला मदत केली. त्यांचं विमान गुजरातला गेलं मात्र महाराष्ट्राकडे त्यांनी पाठ फिरवली हा दुजाभाव आहे. महाराष्ट्रावर गेल्या काही महिन्यात आलेली संकट पाहता केंद्र सरकारने जास्तीत जास्त मदत राज्य सरकारला करावी, अशी आमची मागणी आहे.
(Maharashtra Congress President nana Patole Comment on BJP MNS Alliance)
हे ही वाचा :
भाजप-मनसे युतीचा नारळ फुटला, राज्यातील पहिली युती ‘या’ जिल्ह्यात जाहीर!
दोन दिवसांपूर्वी सोमय्यांची तक्रार घेतली, आज R R आबांचा सख्खा भाऊ पोलीस सेवेतून निवृत्त!
मुंबईकरांच्या रस्त्यांचे ‘रस्ते’ लागले; आशिष शेलारांची शिवसेनेवर खोचक टीका
‘जलयुक्त शिवार’मुळे मराठवाड्यात महापूर, पर्यावरण तज्ज्ञांचा दावा, फडणवीसांच्या योजनेवर पुन्हा प्रश्न