मुंबई : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकांचे निकाल काल स्पष्ट झाले. या निकालाने मी ना आनंदी आहे ना दु:खी आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.तसंच येणाऱ्या निवडणुकांमध्ये यापेक्षा मोठं यश मिळवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
जिलहा परिषदेच्या 85 जागांपैकी भाजपने सर्वाधिक 33 जागा जिंकल्या. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने प्रत्येकी 17 जागा जिंकल्या. शिवसेना चौथ्या क्रमांकावर फेकली गेली. पंचायत समितीच्या 144 जागांपैकी महाविकास आघाडीने 73 जागा जिंकल्या तर भाजपला 33 जागांवर यश मिळालं. अनेक जागांवर अनपेक्षित निकाल लागले. कुठे राजकीय नेत्यांच्या नातेवाईकांचा पराभव झाला, तर कुठे सर्वसामान्य उमेदवारांनी दिग्गजांना धूळ चारली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवरात्रोत्सवाचं निमित्त साधून आज मुंबईत देवाचं दर्शन घेतलं. यानंतर त्यांनी पत्रकारांशी विविध मुद्द्यांवर बाचचित केली. झेडपी निकालावर प्रतिक्रिया देताना या निकालाने मी ना आनंदी आहे ना दु:खी आहे, असं अजित पवार म्हणाले.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, “महाविकास आघाडी असली तरी आम्ही वेगवेगळं लढलो होतो, अशी आठवण यानिमित्ताने अजित पवार यांनी करुन दिली. आमच्या तिघांची मतं पाहिली तर ती निश्चित जास्त होतात”
“प्रत्येकाला वाटत होतं निवडणूक होऊच नये. कारण कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पूर्वीसारख्या जाहीर सभा घेता येत नव्हत्या. मतदारांपर्यंत पोहोचणं अवघड होतं. परंतु या सगळ्या वातावरणात जिल्हा परिषद निवडणूक पार पडली. जनतेनं समाधानकारक निकाल दिला आहे. पण असं असलं तरी मी आनंदी पण नाही आणि दु:खी पण नाही”, असं अजित पवार म्हणाले.
राज्यातील जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत विजय मिळवलेल्या राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांचं मनःपूर्वक अभिनंदन अजित पवार यांनी केलं. प्रगत, पुरोगामी महाराष्ट्राच्या हितरक्षणासाठी, ग्रामीण जनतेच्या विकासासाठी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते एकजुटीनं कार्य करतील. जनतेचा विश्वास संपादन करुन पुढील निवडणुकांमध्ये याहून मोठं यश मिळवतील, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.
(Maharashtra DCM Ajit Pawar reaction on Maharashtra ZP Election results Mahavikas Aaghadi BJP)
हे ही वाचा :
मुख्यमंत्री मुंबादेवीच्या दर्शनाला, अजित पवार, जयंत पाटील सिद्धिविनायक चरणी लीन