उद्धव ठाकरेंचे दोन विश्वासू सहकारी, ज्यांच्या साक्षीने संजय राठोडांचा राजीनामा

| Updated on: Mar 09, 2021 | 3:18 PM

वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. (Maharashtra Forest Minister Sanjay Rathod Resigns)

उद्धव ठाकरेंचे दोन विश्वासू सहकारी, ज्यांच्या साक्षीने संजय राठोडांचा राजीनामा
संजय राठोड, शिवसेना नेते
Follow us on

मुंबई: वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी खासदार अनिल देसाई आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्या उपस्थितीत राठोड यांनी राजीनामा दिला आहे. स्वत: राठोड यांनीही या दोन्ही नेत्यांच्या साक्षीने राजीनामा दिल्याचं मीडियासमोर स्पष्ट केलं आहे. (Maharashtra Forest Minister Sanjay Rathod Resigns)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर संजय राठोड यांनी मीडियाशी संवाद साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मी राजीनामा दिला आहे. अनिल देसाई आणि अनिल परब यांच्या साक्षीने मी राजीनामा दिला आहे, असं राठोड यांनी सांगितलं.

परब-देसाईंची शिवसेनेतील भूमिका काय?

अनिल परब आणि अनिल देसाई हे शिवसेनेतील अत्यंत महत्त्वाचे नेते आहेत. देसाई आणि परब हे दोघेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खास मर्जीतील नेते आहेत. अनिल देसाई हे सध्या राज्यसभेवर आहेत. मोदी सरकारमध्ये मंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे यांनी देसाई यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं होतं. राज्यसभेतील शिवसेनेच्या सर्व नेत्यांना डावलून उद्धव ठाकरे यांनी देसाई यांना मंत्रिपद दिलं होतं. मात्र, नंतर भाजपसोबतचे वाद वाढल्याने मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी दिल्लीला निघालेल्या देसाई यांना उद्धव ठाकरेंनी विमानतळावरून माघारी बोलावलं होतं.

अनिल परब यांचंही शिवसेनेतील स्थान मोठं आहे. शिवसेनेचे संकटमोचक म्हणूनही परब यांच्याकडे पाहिलं जातं. शिवसेनेच्या प्रत्येक मोठ्या निर्णयात परब यांचं मत जाणून घेतलं जातं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्कातील स्मारकामध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. तेव्हाही परब यांनीच त्यावर तोडगा काढला होता. शिवसेनेची रणनीती ठरवण्यामध्ये परब यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे आताही उद्धव ठाकरे यांनी परब-देसाई यांचा सल्ला घेऊनच राठोड यांच्या राजीनाम्याचा निर्णय घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं.

राठोड काय म्हणाले?

मी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मी आमदारकीचा राजीनामा दिला नाही. फक्त मंत्रिपद सोडलं आहे. पूजा चव्हाणच्या मृत्यूप्रकरणावरून विरोधकांनी अत्यंत घाणेरडं राजकारण केलं आहे. या प्रकरणात आमच्या समाजाची बदनामी करण्यात आली आहे. माझी वैयक्तिक बदनामी करण्यात आली. तसेच मला राजकीय जीवनातून उठवण्याचाही प्रयत्न करण्यात आला. गेल्या 30 वर्षांपासूनची माझी राजकीय कारकिर्द उद्ध्वस्त करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्षपाती चौकशी करण्यासाठी मी मंत्रिपदावरून बाजूला होण्याचा निर्णय घेतला आहे, असं राठोड म्हणाले.

कोणतीही चौकशी न करता विरोधकांकडून माझ्या राजीनाम्याची मागणी केली आहे. हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेचा अवमान आहे. हे लोकशाहीच्या विरोधात आहे. राजीनामा दिला नाही तर अधिवेशन चालू देणार नाही, अशी भूमिका विरोधकांनी घेतली होती, ती अत्यंत चुकीची आहे, असंही राठोड यांनी सांगितलं. (Maharashtra Forest Minister Sanjay Rathod Resigns)

 

संबंधित बातम्या:

ठाकरे मंत्रिमंडळातील पहिली विकेट, वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा

…म्हणून मी मंत्रिपद सोडलं, संजय राठोड यांची राजीनाम्यानंतर पहिली प्रतिक्रिया

संजय राठोड यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला! ‘वर्षा’ बंगल्यावर नेमकं काय घडलं?

(Maharashtra Forest Minister Sanjay Rathod Resigns)