कोल्हापूर : भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी 100 कोटींच्या घोटाळ्याच्या केलेल्या आरोपानंतर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेऊन सोमय्यांचे सगळे आरोप फेटाळले आहेत. माझ्याविरोधात सोमय्यांचे आरोप हे भाजपचं षडयंत्र आहे. या सगळ्याचा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील मास्टरमाईंड आहेत. मला त्रास देण्यासाठी, मला कुठेतरी रोखण्यासाठी हे सगळं सुरु आहे, असं सांगत ‘मला भाजपमध्ये येण्याची ऑफर देखील होती’, असा गौप्यस्फोट मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत केला.
चंद्रकांत पाटील हे भाजप प्रदेशाध्यक्ष आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात भाजप भुईसपाट झाला, हे भुईसपाट कुणामुळे झालं, तर मुश्रीफांमुळे, त्यांनी मला भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली होती. पण मी त्यांना ठणकावून सांगितलं, पवार एके पवार. त्यांनी माझ्यावर इन्कम टॅक्सची धाड टाकली, आता महाविकास आघाडी प्रबळ झाली आहे. त्यांच्यासमोर भाजपला यश मिळत नाही, त्यामुळे हे सगळं सुरु आहे, असं हसन मुश्रीफ म्हणाले.
चंद्रकांत पाटलांच्या जिल्ह्यात भाजप झिरो आहे, झेडपी नाही, महापालिका नाही, काहीच नाही शिल्लाक, त्यांना हटवण्याच्या हालचाली दिल्लीत सुरु होत्या, पण अमित शाहांच्या मैत्रीमुळे त्यांना हटवलं नाही, असंही हसन मुश्रीफ म्हणाले.
चंद्रकांत पाटलांनी पुरुषार्थाप्रमाणे लढावे, कुणाचा वापर करुन, माझ्या कुटुंबाची बदनामी करुन काही मिळणार नाही, सगळे आरोप खोटे आहेत, असं हसन मुश्रीफ म्हणाले.
सोमय्यांच्या सीएची पदवी शंकास्पद, सोमय्यांचे आरोप बिनबुडाचे
मी 100 कोटीचा दावा ठोकणार आहे, तो दावा तयार होत आहे. आजच्या कथित घोटाळ्याबाबत केलेला आरोप इतका बिनबुडाचा आहे की सोमय्यांच्या सीएची पदवी शंकास्पद आहे. सोमय्यांनी अभ्यास करावा. मी सीए पाठवतो, ते पाहून घ्या, असं उत्तर मुश्रीफांनी सोमय्यांना दिलं.
मला भाजपमधील नेते सांगतात, आम्ही सोमय्यांना म्हणत होतो मुश्रीफांच्या नादाला लागू नका. गरीब आणि सामान्य जीवाभावाचे लोक माझ्यासोबत आहेत. काल आरोप केला त्याबद्दल त्यांनी माफी मागायलाच हवी. आज त्यांनी अप्पासाहेब नलावडे कारखान्याच्या घोटाळ्याबाबत बोलले. मात्र ब्रिक्स इंडिया कंपनी आणि माझा, माझ्या जावायाचा काही संबंध नाही. मी सगळे डॉक्युमेंट काढले, ब्रिक्स इंडिया कंपनी ही ४४ लाख कॅपिटलची कंपनी आहे, ही शेल कंपनी नाही, त्याचं शेअर कॅपिटल १ लाख आहे, मग १०० कोटीचा घोटाळा कसा होईळ? २०१२-१३ मध्ये हा कारखाना शासनाने ब्रिक्स फॅसिलिटीला चालवायला दिला होता १० वर्षासाठी सहयोगी तत्वावर. ते म्हणतात २०२० ला दिला. सोमय्यांनी अभ्यास करायला हवा होता, २०२० मध्ये त्यांनी ही कंपनी सोडली.
दोन वर्ष आधीच ४३ कोटीला दहा वर्षापूर्वी घेतला, तोटा होत असल्यामुळे दोन वर्षापूर्वीच कंपनीने कारखाना सोडला. २०२० ला कारखाना घेतला न ाही, २०१२-१३ मध्ये राज्य सरकारकडून सहयोगी तत्वावर घेतला, पण नुकसानीमुळे दोन वर्ष आधीच कारखाना सोडला.
माझे नेते शरद पवार, महाविकास आघाडी, परमबीर सिंग किंवा केंद्रीय यंत्रणांच्या गैरवापराबद्दल पत्रकार परिषदा घेऊन मी आवाज उठवला. त्यामुळे भाजप नेते मंडळी मला दाबण्याचा प्रयत्न करत होते. किरीट सोमय्या यांना टूल म्हणून भाजपने वापरलं असल्याचं मुश्रीफ म्हणाले.
मला डेंग्यू होता आणि अशक्तपणा होता. मी किरीट सोमय्यांचा आभारी आहे, त्यांनी मला तब्बेतीसाठी शुभेच्छा दिल्या, असंही मुश्रीफ म्हणाले.
सर्व कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा असं आवाहन हसन मुश्रीफ यांनी केले आहे. किरीट सोमय्या हे चुकीचे आरोप करत आहेत. किरीट सोमय्या यांची स्टंटबाजी कशासाठी? विनाकारण बदनामी करण्याचा प्रयत्न आहे, असंही मुश्रीफ म्हणाले.
अप्पासाहेब नलावडे कारखाना ब्रिक्स इंडिया कंपनीने मुदतीच्या दोन वर्षापूर्वी सोडला, कंपनीला तोटा झाला. नितीन गडकरींचं मार्गदर्शन घेतलं असतं तर सोमय्यांना बरं झालं असते. मी आधी १०० कोटीचा आणि आता दुसरा ५० कोटीचा फौजदारी गुन्हा दाखल करणार आहे. दोन अब्रुनुकासनीचे दावे दाखल करणार, असंही मुश्रीफ म्हणाले.
सोमय्यांनी आरोप केले, तक्रार केली तर मग तुम्ही पर्यटनासाठी तिकडे कशाला जाता? यांना तुरुंगात टाकणार, त्यांना जेलमध्ये टाकणार असं म्हणतात, याविरोधात आम्ही कोर्टात जाणार, हे न्यायाधीश झालेत का?, असा सवालही मुश्रीफांनी यावेळी विचारला.
“मी १७ वर्षे मंत्री, आजपर्यंत एकही डाग नाही, आता तीन वर्षात मंत्रिपदाला २० वर्षे होतील, महाविकास आघाडीला अस्थिर करण्याचा प्रयत्न आहे. शरद पवारांचं नाव का घेतात? त्यांची लायकी आहे का? उद्धव ठाकरेंचं नाव का घेता? तुरुंगात टाकणार किंवा तशी भाषा करतात, त्यांना हे थांबवावं लागेल, त्यासाठी कोर्टात जाणार”, असंही मुश्रीफ म्हणाले.
“ज्या ज्या खात्यात मी काम केलं, त्या त्या खात्यात चांगलं काम करुन दाखवलं. आम्ही चांगली कामं केली त्यामुळेच लोक माझ्यासाठी जमतात. दहा वर्षापूर्वी साखर कारखान्याचा विषय आता काढला जातोय, कारण का तर मंत्री झाल्यानंतर काहीच मिळत नाही.”
“चंद्रकांत पाटलांनी घोटाळा केला आहे, मी महाविकास आघाडीच्या नेत्यांना सांगितलंय, आपल्याला आता शांत बसून चालणार नाही, आपल्या सगळ्यांवर हे आरोप करतील, आपल्याला त्यांचे घोटाळे काढावे लागतील, लोकशाही मार्गाने सगळं करावं लागेल. प्रसारमाध्यमांनीही जे योग्य ते दाखवावं. चंद्रकांत पाटलांच्या दबावामुळे हे सुरु आहे. चंद्रकांत पाटलांनी मला भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली होती”, असंही मुश्रीफ म्हणाले.
(Maharashtra Minister Hasan Mushriff Press Conference After BJp Leader Kirit Somaiya Allegation)