विधान परिषदेच्या 11 जागांचे निकाल लागले आहेत. या निवडणुकीत महायुतीने शंभर टक्के यश मिळवलं आहे. महायुतीचे सर्वच्या सर्व 9 उमेदवार निवडून आले आहेत. तर महाविकास आघाडीचा एकच उमेदवार निवडून आला आहे. दोन उमेदवारांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. म्हणजेच महाविकास आघाडीचा एक उमेदवार पडणार असल्याचं चित्र आहे. या निवडणुकीत काँग्रेसची 7 मते फुटल्याची चर्चा आहे. पण ही मते भाजपने फोडली नाहीत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याऐवजी दुसऱ्या नेत्यानेच काँग्रेसचा गेम केल्याचं सांगितलं जात आहे. काँग्रेसची मते फुटल्यामुळेच महाविकास आघाडीचा एक उमेदवार पराभवाच्या छायेत गेल्याचं स्पष्ट झालं आहे.
या निवडणुकीत विजयासाठी 23 मतांचा कोटा ठेवण्यात आला होता. काँग्रेसकडे 37 मते होती. प्रज्ञा सातव यांना 25 मते मिळाली. म्हणजे त्यांनी कोट्यापेक्षा अधिक दोन मते घेतली. सातव यांना 25 मते मिळाल्याने काँग्रेसची 12 मते शिल्लक उरली होती. ही सर्व मते महाविकास आघाडीच्या उमदेवारांना ट्रान्सफर व्हायला हवी होती. पण वेगळंच घडलं. ठाकरे गटाकडे 17 मते होती. त्यामुळे ठाकरे गटाच्या मिलिंद नार्वेकर यांना काँग्रेसच्या 6 मतांची गरज होती. ही मते मिळाली असती तर नार्वेकरांना विजयासाठीची 23 मते मिळाली असती. पण प्रत्यक्षात नार्वेकर यांना 22 मते मिळाली. म्हणजेच काँग्रेसची सात मते फुटली, हे स्पष्ट होत आहे.
या निवडणुकीत अजितदादा गटाकडे 42 मते होती. त्यांनी दोन उमेदवार उभे केले होते. या निवडणुकीत अजितदादा गटाच्या अजित विटेकर यांना 23 मते मिलाली. तर शिवाजीराव गर्जे यांना 24 मते मिळाली. अजितदादा गटाला या निवडणुकीत चार मतांची गरज होती. पण प्रत्यक्षात अजितदादा गटाला 47 मते मिळाली. म्हणजे 5 अतिरिक्त मते अजितदादा गटाला मिळाली. म्हणजेच काँग्रेसच्या 7 पैकी 5 मते अजितदादा गटाने फोडली. याचाच अर्थ देवेंद्र फडणवीस यांनी नव्हे तर अजित पवार यांनीच काँग्रेसचा गेम केल्याचं दिसून आलं आहे. काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
या निवडणुकीत दगाफटका होऊ नये म्हणून सर्वच राजकीय पक्षांनी काळजी घेतली होती. अजितदादा गट, ठाकरे गट, शिंदे गट आणि भाजपने आपआपल्या आमदारांना दोन दिवस पंचतारांकित हॉटेलात ठेवलं होतं. त्यांना मतदान कसं करायचं याचं मार्गदर्शन केलं होतं. तसेच या आमदारांच्या संपर्कात इतर पक्षाचे नेते येऊ नयेत म्हणून खबरदारी घेतली गेली होती. फक्त शरद पवार गट आणि काँग्रेसने आमदारांना हॉटेलात ठेवलं नव्हतं. शरद पवार पुरस्कृत उमेदवार जयंत पाटील यांना 12 मते मिळाली आहे. शरद पवार गटाकडे 12 मतेच होती. ती सर्व जयंत पाटील यांना मिळाल्याचं चित्र आहे. पण आमचे उमेदवार फुटणार नाही. आम्हाला आमदारांना हॉटेलात ठेवण्याची गरज नाही, असं काँग्रेसचे नेते सांगत होते. काँग्रेस नेत्यांना त्यांचा हाच आत्मविश्वास नडला असल्याचं सांगितलं जात आहे.