मुंबईः विधानभवनाच्या (Maharashtra Assembly) पायऱ्यांवर आज सत्ताधारी आणि विरोधक आमदारांमध्ये (NCP MLA) जोरदार बाचाबाची झाली. अधिवेशनात (Maharashtra Monsoon Session) मागील चार दिवस विरोधकांनी 50 खोके एकदम ओके.. अशी घोषणाबाजी केली. याला उत्तर देण्यासाठी सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटातील आमदारांनी आज विरोधक येण्यापूर्वीच पायऱ्यांवर जागा पकडली. पण आमची घोषणाबाजी, आंदोलन सुरु असताना विरोधकांनी येऊन गोंधळ घातला. आमचं आंदोलन पूर्ण होऊ द्यायचं असतं आम्ही पायऱ्या मोकळ्या केल्या असत्या, अशा शब्दात शिवसेना आमदार भरत गोगावले यांनी सत्ताधाऱ्यांची भूमिका मांडली. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीदेखील सत्ताधाऱ्यांना नेमके कोणते शब्द जिव्हारी लागले, याचं स्पष्टीकरण दिलं. एकूणच आजचं कामकाज सुरु होण्यापूर्वीच विधान भवनाच्या पायऱ्यांवर अभूतपूर्व राडा पहायला मिळाला.
एकनाथ शिंदे गटातील आमदार भरत गोगावले यांनी या गोंधळानंतर माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले,’ आमचं पूर्ण होऊ द्यायचं, पायऱ्या मोकळ्या करायच्या असल्या. हा कुठला प्रकार…? म्हणून आम्हीही उत्तर दिलं. आम्ही कुणाला पाय लावत नाही. कुणी आम्हाला पाय लावायचा प्रयत्न केला तर आम्ही सोडणार नाहीत. जो येईल अंगावर त्याला घेऊ शिंगावर….
पन्नास खोके, एकदम ओके या घोषणाबाजीमुळे सत्ताधारी दुखावल्याची टीका विरोधकांनी केली आहे. याला उत्तर देताना भरत गोगावले म्हणाले, ‘ आम्ही आधी आलो. १० वाजल्यापासून इथे आलो होतो. ते जेव्हा काल-परवा आले होते, आम्ही काही बोललो? बाजूने जात होतो. म्हणजेच ५० खोके आम्ही घेतलेले नाहीत. त्यांनी केलेला प्रयत्न केविलवाणा होता. सिंचन घोटाळ्याची चर्चा सुरु आहे… अनिल देशमुख, वाझे, नवाब मलिक जेलमध्ये का आहेत? आम्ही कुणाच्याही आत जात नाहीत… एवढ्या गर्दीत होते, आम्ही पण ढकलंलं, आमच्या मार्गाला ते आडवे का आले… रोज खोके खोके नाचवतायत एकदा का बोके देऊन टाकू म्हणून आम्ही ते केलं….
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी म्हणाले, ‘ आजचा प्रकार महाराष्ट्राला शोभणारा नाही. आम्हाला लोटण्याचा प्रयत्न झाला. ज्या पद्धतीने सत्ताधाऱ्यांची दादागिरी सुरु आहे. ती वाईट आहे. शिंदे, रोहित पवार आणि मी आम्हाला तिघांना ढकलण्यात आलं. ते सकाळपासून आले होते. साडे दहा वाजता विरोधकांचे आमदार घोषणा करणार, हे त्यांना माहिती नव्हतं. सरकारला ओला दुष्काळ जाहीर करणार आहात की नाही, याबद्दल आम्ही आंदोलन करणार होतो. दहा वाजता आम्ही आलो. साडे दहा वाजता आंदोलन करायला आलो. त्याआधी शिंदे-भाजपचे काही आमदार आंदोलन करत होतो. आम्ही नेहमी प्रमाणे 50 खोके एकदम ओके अशी घोषणा केली. या घोषणेमुळे अनिल पाटील यांनी गळ्यात गाजराचा हार घातला होता. आम्हीही एक-एक गाजर घेऊन सत्ताधारी आमदारांसमोर आंदोलन करत असताना ते गोंधळ घालायला लागले. पत्रकारांच्या अंगावर ढकलू लागले. त्यात काही महिला पत्रकारांना वाचवण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला. ज्या आमदारांना मी ओळखत नाही, त्यांनीही अप्रत्यक्षपणे आई-बहीण काढली. तेच आमदार इथे येऊन आम्हाला शिंगावर घेऊ म्हणतात…