मुंबई : अजित पवार (Ajit Pawar) यांनी सत्तेत पाऊल ठेवताच राष्ट्रवादी आणि काँग्रच्या नेत्यांकडून त्यांच्यावर सडकून टिका होत आहे. राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर अजित पवार यांना चांगलेच धारेवर धरण्यात येत आहे. काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी देखील आता अनेक दावे केलेले आहेत. अजित पवार यांची एंट्री झाल्याने एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाला धोका निर्माण झाल्याची चर्चा आधीपासूनच राजकीय वर्तुळात रंगत होती. त्यात आता पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील उडी घेतली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी काय दावे केले आहेत ते जाणून घेऊया.
अजित पवार सत्तेत आल्याने भाजपसाठी एकनाथ शिंदे यांची उपयुक्तता संपलेली आहे, असा दावा काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. कट्टर काँग्रेसवादी असलेले पृथ्वीराज चव्हाण यांनी आणखी एक मोठा दावा केलेला आहे. नितीन गडकरी आणि संघाचा अजित पवारांच्या सरकारमधील विरोध असल्याचे पृथ्वीराज चव्हण म्हणाले. राष्ट्रवादिला संपवण्यासाठी सोनिया गांधींनी मला महाराष्ट्रात पाठवलं हा पवारांचा गैरसमज असल्याचेही चव्हाण यावेळी म्हणाले. आघाडीच्या काळात मी मुख्यमंत्री झाल्यापासून शरद पवारांना माझ्याबद्दल गैरसमज आहे असे देखील ते म्हणाले. यासोबतच अजित पवारांना भाजप मुख्यमंत्री करणार असा दावा पृथ्वीराज चव्हाण यानी केला. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे सर्व सांगितले आहे.
अजित पवार यांनी या आधीही भाजप सोबत जात पहाटे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती, मात्र शरद पवार यांना अजित पवारांची मनधरणी करण्यात यश आल्याने ते आल्या पाऊली परत गेले होते. आता मात्र चित्र वेगळे आहे. छगन भुजबळ आणि प्रफुल्ल पटेल यांसारख्या बड्या नेत्यांनी त्यांच्या भुमिकेला खंबीर पाठींबा दिल्याने अजित पवार यांचं पारडं जड असल्याचं चित्र आहे. तर दुसरीकडे खुद्द शरद पवार हे मैदानात उतरल्याने मतदारांचे मन वळवण्याचा त्यांचा प्रयत्न दिसत आहे. यावेळी अजितदादांना परत आणण्यापेक्षा आगामी निवडणूकांवर शरद पवार लक्ष केंद्रित करत असल्याचे राजकिय विश्लेशकांचे म्हणणे आहे. निवडणूकीच्या पाश्वभूमीवर शरद पवार काय खेळी खेळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे.