महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात ‘त्या ‘बैठकीत नेमकी काय चर्चा झाली?

| Updated on: Apr 16, 2023 | 2:07 PM

"मंगळवारी संध्याकाळी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर शरद पवारांना भेटलो. ते म्हणाले, कोणालाही मनापासून सोडून जायचे नाही, पण कुटुंबाला टार्गेट केले जात आहे. कुणाला काही व्यक्तिगत निर्णय घ्यायचे असतील तर तो त्यांचा प्रश्न", असा मोठा खुलासा संजय राऊत यांनी केला आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात त्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली?
Image Credit source: TV9 Network
Follow us on

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज त्यांच्या ‘सामना’ वृत्तपत्राच्या रोखठोक सत्रातून महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर रोखठोकपणे भाष्य केलं आहे. राज्यात सध्या महाविकास आघाडीत बिघाडी होणार असल्याच्या चर्चा आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार काही दिवसांपूर्वी अचानक नॉट रिचेबल झाले होते. त्यानंतर ते दुसऱ्या दिवशी माध्यमांसमोर आले होते. महाविकास आघाडीची आज नागपुरात मोठी सभा आयोजित करण्यात आलीय. या सभेतही अजित पवार यांच्या उपस्थितीवरुन विविध चर्चांना उधाण आलं आहे. असं असताना संजय राऊत यांनी त्यांच्या ‘रोखठोक’ सदरातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी झालेल्या बैठकीतील माहिती उघड केल्याने खळबळ उडवून दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची चार दिवसांपूर्वी महत्त्वाची बैठक पार पडली होती. शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानीच ही बैठक पार पडली होती. या बैठकीत नेमकी काय माहिती समोर येईल, अशी अनेकांना उत्सुकता होती. अखेर या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, याबद्दल स्वत: संजय राऊत यांनी खुलासा केला आहे. विशेष म्हणजे या बैठकीत संजय राऊत हे देखील उपस्थित होते.

संजय राऊत यांचा खुलासा नेमका काय?

“मंगळवारी संध्याकाळी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर शरद पवारांना भेटलो. ते म्हणाले, कोणालाही मनापासून सोडून जायचे नाही, पण कुटुंबाला टार्गेट केले जात आहे. कुणाला काही व्यक्तिगत निर्णय घ्यायचे असतील तर तो त्यांचा प्रश्न, पण ‘पक्ष’ म्हणून आम्ही भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेणार नाही. महाराष्ट्रातील लोकांत सध्याच्या सरकारबद्दल कमालीचा संताप आहे. जे आता भाजपबरोबर जातील ते राजकीय आत्महत्या करतील असे पवार-ठाकरे यांचे मत पडले”, अशी माहिती संजय राऊतांनी आपल्या लेखातून दिली.

हे सुद्धा वाचा

“ईडीच्या दहशतीने लोकांना फोडणे हे सभ्य लोकांचे राजकारण नाही. राजकारणात राहून लोकांनी अमाप संपत्ती कमावली. ती टिकविण्यासाठी त्यांना सत्तेची कवचकुंडले हवीच असतात. घाऊक पक्षांतरे त्यातून होतात. पवार यांनी एक चांगला मुद्दा मांडला, ‘आज जे भीतीने पक्ष सोडत आहेत त्यांना मी सांगतो, तुम्ही भाजपात गेल्याने टेबलावरची फाईल कपाटात जाईल, पण या ईडी-सीबीआयच्या फाईली कधीच बंद होत नाहीत”, असं संजय राऊत म्हणाले.

“शिंद्यांबरोबर गेलेल्या 11 आमदार व 6 खासदारांच्या फायली सध्या टेबलावरून कपाटात गेल्या आहेत. शिंदे गटाप्रमाणे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांच्या अशा किती फायली कपाटात जातील ते पाहायचे. आज राज्याचे चित्र काय आहे? शिंदे सरकारचे मंत्री मंत्रालयात जात नाहीत. देवेंद्र फडणवीस ‘सागर’ बंगल्यावरून काम करतात. शिंदे यांच्या ताब्यात ‘वर्षा’सह तीन सरकारी बंगले आहेत. शिंदे यांचे चिरंजीव प्रशासनात सरळ हुल्लडबाजी करतात. त्यामुळे मंत्रालयापासून सर्वत्र अस्वस्थता आहे. सरकार कोठे चालले आहे? ते मंत्रालयातच झोपले आहे”, अशी टीका संजय राऊतांनी आपल्या लेखात केली आहे.