मुंबईः एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटातील 40 आमदारांनी आता बंड पुकारलंच आहे तर उद्धव ठाकरेंनीही उरल्या सुरल्या शिवसैनिकांच्या बळावर मोठी योजना आखल्याचं दिसून येत आहे. गुवाहटीत गेलेल्या शिवसेना आमदारांना (ShivSena MLA) भावनिक साद घालून झाली आणि कठोर इशाराही देऊन झाला. कायदेशीर कारवाईदेखील प्रक्रियेत आहे. एकनाथ शिंदे गटातील आमदरांनीही अद्याप शिवसेनेच्या आवाहनाला प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे महाविकास आघाडीत राहूनच शिवसेनेला अधिक भक्कम करण्यावर जोर दिला जाईल, अशी रणनीती शिवसेनेकडून आखली गेल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याशीदेखील उद्धव ठाकरेंनी चर्चा केली असून याच बैठकांमधून शिवसेनेसाठी नवा प्लॅन तयार करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यात प्रामुख्याने तीन गोष्टींवर भर दिला जाणार आहे. त्या पुढीलप्रमाणे-
महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या आमदारांनीच बंडाळी केल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चांगलेच कोंडीत सापडले आहेत. मात्र आता माघार न घेता, शिवसैनिकांमध्ये उत्साह भरण्याची मोठी मोहीम शिवसेनेनं हाती घेतली आहे. कालच मुंबईत याचा प्रत्यय आला. आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात बंडखोरीनंतर पहिला शिवसेना मेळावा आयोजित करण्यात आला. हजारो शिवसैनिकांनी यावेळी मेळाव्याला हजेरी लावली आणि आम्ही अजूनही ठाकरेंसोबत असल्याचा विश्वास दिला. आजदेखील संजय राऊतांच्या नेतृत्वात एका मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. दोन दिवसांपूर्वी सर्व जिल्हा प्रमुखांचीही उद्धव ठाकरेंनी बैठक घेतली. आपण पुन्हा एकदा लढण्यासाठी, संघर्षासाठी तयार आहोत, असं सांगत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना बळ दिलं. त्यामुळे पक्ष संघटन वाढवण्याला शिवसेनेनं आपल्या भविष्यातील रणनीतीत महत्त्वाचं स्थान दिलं आहे.
पक्षादेश न पाळणाऱ्या बंडखोर आमदारांवर थेट कारवाई न करता कायद्याचं हत्यार वापरत लढा देण्याची शिवसेनेनं ठरवलेलं दिसतंय. 16 आमदारांविरोधात शिवसेनेनं सदस्यत्व निलंबनाची कारवाई सुरु केली आहे. मात्र याविरोधात शिंदे गट कोर्टात दाद मागणार आहे. पक्षाचा आदेश न पाळणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचा अधिकार शिवसेनेला आहे, असे सांगत शिवसेना कोर्टातील लढाई जिंकू शकते. एकनाथ शिंदे गट अजूनही शिवसेनेतच राहणार असल्याचं वारंवार सांगत आहे. तसेच दोन तृतीयांश आमदारांचं पाठबळ असल्याचं सांगत शिवसेना पक्षावरच दावा ठोकणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र शिवसेनेनं शिवसेना किंवा बाळासाहेब ठाकरेंचं नाव न वापरण्याचा इशारा शिंदे गटाला दिला आहे. शिंदे गटाकडून तसा काही प्रयत्न झाल्यास याविरोधातही कोर्टात जाण्याची शिवसेनेची तयारी असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे शिवसेनेचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची नुकतीच बैठक झाली असून कायदेशीर लढाईत राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेच्या सोबत असल्याचे सांगण्यात आले आहे.
मोठ्या प्रमाणावर आमदार फुटल्यामुळे महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या सरकारमधील अस्तित्वावरच संकट कोसळलंय. एकनाथ शिंदे गटानं उद्या सरकारचा पाठींबा काढला तर पुढील रणनीती काय असेल, यावर सध्या शिवसेनेच्या नेत्यांच्या बैठका सुरु आहेत. बंडखोर आमदारांनी सरकारचा पाठइंबा काढल्याचं पत्र राज्यपालांना दिलं तर विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जावं लागेल. त्यापूर्वी 16 सदस्यांवर अपात्रतेची कारवाई झाली तर बंडखोर पक्षांतरबंदीच्या कायद्यातून वाचू शकणार नाहीत. परिणामी इतर आमदार आणि सदस्यांनावर शिवसेना दबाव आणू शकेल. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि दबावाखाली शिंदे गटात गेलेल्या आमदारांच्या पाठिंब्याने पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकार स्थापनेचे प्रयत्न शिवसेनेकडून केले जातील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.