मुंबई : राज्यात एकनाथ शिंदे सरकार येऊन महिना लोटला. मात्र अद्यापही मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) होऊ शकला नाही. त्यावरून शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde-Fadnavis Government) विरोधकांकडून जोरदार टीका केली जातेय. अशावेळी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत एक महत्वाची बातमी सूत्रांनी दिलीय. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार 5 ऑगस्टला होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर 12 संभाव्य मंत्र्यांची यादीही समोर आलीय. त्यात भाजपकडून 7 आणि शिंदे गटातील 5 नावांचा समावेश आहे. त्यात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाचा समावेश आहे. तर शिंदे गटाकडून गुलाबराव पाटील, दादा भुसेंचाही समावेश करण्यात आल्याची माहिती मिळतेय.
राज्यातील सत्तापालटाला आता महिना उलटून गेलाय. मात्र अद्यापही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. त्यामुळे विरोधकांकडून राज्य सरकारवर जोरदार टीका करण्यात येतेय. अशावेळी शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. येत्या रविवारपर्यंत राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होईल, असा दावाच दीपक केसरकर यांनी केलाय. इतकंच नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबतची अधिकृत घोषणा करतील, अशी माहितीही केसरकर यांनी दिलीय.
एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे या सुप्रीम कोर्टात सुरु असलेल्या प्रकरणावर उद्या म्हणजेच 04 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. आज दोन्ही पक्षातील वकिलांनी विविध मुद्द्यांवर जोरदार युक्तिवाद केला. त्यानंतर उद्या सुप्रीम कोर्टात या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. गुरुवारी सुप्रीम कोर्टाच्या पटलावर पहिलीच केस घेतली जाईल. कोर्टाचं कामकाज सकाळी 10.30 वाजता सुरु होतं. त्यामुळे उद्या सकाळपासून पुन्हा एकदा दोन्ही गटाचे वकील आपापल्या मुद्द्यांवर युक्तिवाद करतील. आज उद्धव ठाकरे यांच्या गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी शिंदे गटातील आमदारांवर पक्षांतर बंदी कायद्यानुसार, अपात्रतेची कारवाई झाली पाहिजे, यासाठी जोरदार युक्तिवाद केला. तर शिंदे गटाचे वकील हरिश साळवे यांनीदेखील आम्ही अजून पक्ष सोडला नसल्याने पक्षांतर बंदी कायदा आम्हाला लागूच होऊ शकत नाही, असा युक्तिवाद केला. त्यानंतर कोर्टानेही दोन्ही पक्षांच्या वकिलांसमोर काही प्रश्न उपस्थित केले.