“MIDC बाबत तुम्ही वैभव नाईक यांच्यावर टीका केली, अरे तुझा बाबा मुख्यमंत्री होता,. उद्योग मंत्री होता, काय तोडली कोणाची?. चेंबूरमधल्या गल्लीतून उचलून आणून, तुला बाळासाहेबांनी मुख्यमंत्री केलं, त्यांचा तू होऊ शकला नाय” अशा शब्दात ठाकरे गटाचे नेते माजी आमदार परशुराम उपरकर यांनी नितेश आणि निलेश राणेंवर टीका केली. “आम्ही सर्व राणेंना सोडून परत आलो, कारण राणेंची घराणेशाही. आपल्या भावाला तिकीट देत नाय, कार्यकर्त्यांना तिकीट नाही पण मुलाला तिकीट देतात” अशी टीका परशुराम उपरकर यांनी केली.
“आज राणेंना धनुष्यबाण घेताना, लाज वाटली पाहिजे होती. आता राणेंसोबत असलेल्या कार्यकर्त्यांना, उद्या राणेंच्या नातवांचे झेंडे लावावे लागतील. त्यांना सांगा लवकर शिवसेनेत या. वैभव नाईक यांना जिल्ह्याचा पालकमंत्री करायचं आहे” असं परशुराम उपरकर म्हणाले. “लोकांना रोजगार दिले असे राणे म्हणत आहेत, मात्र जे त्यांच्या हॉटेलमधले काम सोडून गेले, त्यांचा पगार दिला नाही. प्रहारवाल्यांचा दोन वर्षाचा पगार अजून दिला नाही” असा आरोप परशुमराम उपरकर यांनी केला.
‘राणेंच्या कोणाकडे नसतील तेवढ्या कुंडल्या माझ्याकडे आहेत’
“अशाना आपण घरी बसवलं पाहिजे. या घराणेशाहीच्या बुडाला आम्हाला मशाल लावायची आहे आणि त्यांना संपुष्टात आणायचं आहे. राणेंना आम्ही जिल्ह्यात आणलं, आमची लाज आहे. घरातून लुंगी लावून मच्छी मार्केटमध्ये जात होते आणि मासे घेऊन घरी जायचे, बाकी त्यांना काही माहीत नव्हतं. राणेंच्या कोणाकडे नसतील तेवढ्या कुंडल्या माझ्याकडे आहेत. मुलाच्या पण आहेत” अशा शब्दात परशुराम उपरकर यांनी टीका केली.