Maharashtra Election 2024 : ‘या’ मतदारसंघांमध्ये ‘बिग फाईट’; अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष असणार, एकदा हे वाचाच!

| Updated on: Oct 25, 2024 | 12:36 PM

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात होणार असून येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदार पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबर रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणत्या मतदारसंघात तिहेरी लढत रंगणार, ते पाहुयात..

Maharashtra Election 2024 : या मतदारसंघांमध्ये बिग फाईट; अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष असणार, एकदा हे वाचाच!
maharashtra assembly election 2024
Image Credit source: Tv9
Follow us on

आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत पहायला मिळणार आहे. असं असलं तरी मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काय परिणाम होईल हेसुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सर्वच पक्ष आपली उमेदवारी जाहीर करत आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात असे काही मुद्दे आहेत, ज्यामुळे महाविकास आघाडीला पूरक वातावरण निर्माण झालं आहे. मात्र नुकत्याच पार पडलेल्या हरियाणा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संभ्रमाचं वातावरण तयार झालंय. शिवसेनेतील आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरी, आमदारांची निष्ठा, बदललेली राजकीय गणितं, 2024 च्या लोकसभेच्या निकालात भाजपची झालेली निराशा, आरक्षणाचा मुद्दा हे सर्व मुद्दे या निवडणुकीत विचारात घ्यावे लागणार आहेत. काही मतदारसंघांमध्ये तिहेरी लढत पहायला मिळणार आहे. या लढाईत कोणाच्या पदरात किती मतं पडणार, याचं उत्तर विधानसभा निवडणुकीच्या निकालातच मिळेल. कोणकोणत्या मतदारसंघात तिहेरी लढत पहायला मिळणार, त्याविषयी सविस्तर जाणून घेऊयात..

माहीम-

माहीम मतदारसंघातून मनसेनं अमित ठाकरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर उद्धव ठाकरेंनी या मतदारसंघातून महेश सावंत यांना उमेदवारी जाहीर केली. त्याआधी शिवसेना शिंदे गटाकडून सदा सरवणकर यांना तिकिट देण्यात आलं आहे. त्यामुळे माहीम मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. या मतदारसंघात गेल्या तीन निवडणुकांमध्ये शिवसेना विरुद्ध मनसे अशीच लढत झाल्याचं पहायला मिळालं होतं. यात 2009 मध्ये मनसेचे नितीन सरदेसाई विजयी झाले होते. तर 2014 आणि 2019 मध्ये सदा सरवणकर यांनी बाजी मारली होती. यावेळी शिवसेनेचे दोन्ही गट आणि मनसे अशी तिरंगी लढत होणार आहे. त्यामुळे या मतदारसंघाकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. मनसेचे अमित ठाकरे यंदा पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांच्याविरोधात दोन मातब्बर नेते उभे असल्याने अमित ठाकरेंना या निवडणुकीत कडवी झुंज द्यावी लागणार आहे.

माहीम मतदारसंघातील मागील निवडणुकांचे निकाल-

  • 2009-
    नितीन सरदेसाई (मनसे)- 48,734 मतं
    सदा सरवणकर (काँग्रेस)- 39,808 मतं
    आदेश बांदेकर (शिवसेना)- 36,364 मतं
  • 2014-
    सदा सरवणकर (शिवसेना)- 46,291 मतं
    नितीन सरदेसाई (मनसे)- 40,350 मतं
    विलास अंबेकर (भाजप)- 33,446 मतं
  • 2019-
    सदा सरवणकर (शिवसेना)- 61,337 मतं
    संदीप देशपांडे (मनसे)- 42,690 मतं
    प्रवीण नाईक (काँग्रेस)- 15,246 मतं

महेश सावंत, सदा सरवणकर, अमित ठाकरे

ठाणे-

ठाण्यातील चारही विधानसभा मतदारसंघात यंदा चांगलीच चुरस पहायला मिळणार आहे. ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात भाजप, मनसे आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांच्यात तिहेरी लढत अटळ आहे. या मतदारसंघातून भाजपने तिसऱ्यांदा संजय केळकर यांना उमेदवारी दिली आहे. तर मनसेचे फायरब्रँड नेते अशी ओळख असलेले अविनाश जाधव दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून राजन विचारे निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.

हे सुद्धा वाचा

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक संजय भोईर यांनी या मतदारसंघात निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यासाठी त्यांनी मतदारसंघात फलकबाजीही केली होती. परंतु भाजपने संजय केळकर यांना उमेदवारी दिल्याने शिंदे गटाला केळकर यांचा प्रचार करावा लागणार आहे. या मतदारसंघात जुन्या ठाणे शहरातील जुन्या आणि नवीन ठाण्याचा काही भाग येतो. इथे संजय केळकर दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.

2014 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती तुटली होती. तेव्हा शिवसेनेकडून रविंद्र फाटक यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर भाजपने संजय केळकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं. या निवडणुकीत केळकरांनी फाटक यांचा पराभव केला होता. त्यानंतर 2019 मध्ये शिवसेना आणि भाजपची युती होती. तेव्हा या मतदारसंघात भाजपने पुन्हा संजय केळकरांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत मनसे आणि भाजप अशी थेट चुरस होती. केळकरांविरोधात मनसेचे अविनाश जाधव निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. या निवडणुकीत अविनाश जाधव यांचा जवळपास 20 हजार मतांनी पराभव झाला होता.

राजन विचारे, संजय केळकर आणि अविनाश जाधव

बेलापूर-

बेलापूर हा नवी मुंबईतील चर्चेतला विधानसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात यंदाही तिरंगी लढत पहायला मिळणार आहे. इथे भाजपने सलग दोन वेळा आमदार म्हणून जिंकून आलेल्या मंदा म्हात्रेंना उमेदवारी दिली आहे. तर मनसेकडून गजानन काळे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं गेलंय. बेलापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपने उमेदवारी न दिल्याने नाराज झालेले संदीप नाईक यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नवी मुंबईत येईन बेलापूरमधून त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केला. त्यामुळे बेलापूरमध्ये भाजपच्या मंदा म्हात्रे, मनसेचे गजानन काळे आणि शरद पवार गटाचे संदीप नाईक यांच्यात तिहेरी लढत होणार आहे.

बेलापूर विधानसभा मतदारसंघात भाजपचं पारडं जड आहे. 2009 मध्ये नवीन बेलापूर मतदारसंघात भाजपच्या सुरेश हावरे यांचा पराभव करत राष्ट्रवादी काँग्रेसकडून गणेश नाईक पहिल्यांदा निवडून आले होते. त्यानंतर 2014 मध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपच्या मंदा म्हात्रे यांनी सुमारे 55 हजार मतांनी विजय मिळविला होता. पुढे 2019 मध्ये भाजप-शिवसेना महायुतीच्या उमेदवार म्हणून मंदा म्हात्रे यांनी पुन्हा एकदा सुमारे 44 हजार मतांनी विजय मिळविला.

नवीन विधानसभा रचनेनुसार नवी मुंबई शहरात ऐरोली आणि बेलापूर असे दोन विधानसभा क्षेत्र तयार झाले. ऐरोली विधानसभा मतदारसंघातून भाजपने यंदाही गणेश नाईक यांना उमेदवारी दिली आहे. मात्र बेलापूरमधील जागेवर नाईक यांच्या पुत्रानेच तुतारी हाती घेतल्याने आता या मतदारसंघातील निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे.

संदीप नाईक, मंदा म्हात्रे आणि गजानन काळे

कोथरूड-

2008 मध्ये शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचं विभाजन करण्यात आलं होतं. त्यानंतर कोथरूड हा नवीन विधानसभा मतदारसंघ तयार झाला. यंदा कोथरूडमधून भाजपने चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिली आहे. तर मनसेनं किशोर शिंदेंना तिकिट दिलं आहे. या मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार अद्याप जाहीर व्हायचा आहे. हा उमेदवार जाहीर झाल्यानंतर कोथरूडमध्येही तिरंगी लढत पहायला मिळणार आहे.

कोथरूडमध्ये किशोर शिंदे हे 2009 आणि 2019 च्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते. या मतदारसंघात शिवसेनेनं पहिली मोहोर उमटवली होती. शिवसेनेचे चंद्रकांत मोकाटे हे निवडून आले होते. त्यानंतर 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या मेधा कुलकर्णी यांनी मोकाटे यांचा पराभव करत विजय मिळविला होता. मात्र 2019 मध्ये भाजपने मेधा कुलकर्णींना तिकिट नाकारलं होतं. त्याऐवजी चंद्रकांत पाटील यांना कोथरूडची उमेदवारी दिली होती. या विधानसभा निवडणुकीत चंद्रकांत पाटील विरुद्ध किशोर शिंदे अशी चुरल रंगली होती. त्यात किशोर शिंदेंचा पराभव झाला होता. 2019 च्या निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांना 1,05246 इतकी मतं मिळाली होती. तर मनसेच्या किशोर शिंदेंना सुमारे 80 हजार मतं मिळाली होती. यंदाच्या निवडणुकीतही मनसेला चुरशीची लढत देता येईल, असं चित्र दिसून येत आहे. या मतदारसंघासाठी महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गटही इच्छुक आहे. त्यामुळे मविआकडून कोण उमेदवार असणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

चंद्रकांत पाटील, किशोर शिंदे

वरळी-

वरळी विधानसभा मतदारसंघ हा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो. याच वरळी मतदारसंघात यंदा तिहेरी लढत होण्याची शक्यता आहे. वरळीत ठाकरे गटाकडून आदित्य ठाकरेंनी उमेदवारी अर्ज भरला आहे. तर मनसेकडून संदीप देशपांडे यांना तिकिट देण्यात आलं आहे. त्यामुळे यंदा वरळीत पुतण्याच्या विरोधात काकांनी उमेदवार उभा केल्याची चर्चा रंगली आहे. दुसरीकडे शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून मिलिंद देवरांना तिकीट मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. 2019 च्या निवडणुकीत आदित्य ठाकरेंनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळविला होता.

संदीप देशपांडे, मिलिंद देवरा, आदित्य ठाकरे

या विधानसभा मतदारसंघात बीडीडी चाळ, डिलाईल रोड, वरळी कोळीवाडा, वरळी सी फेस असा विभाग येतो. इथे उच्चभ्रू मतदारांची संख्याही अधिक आहे. 2019 मध्ये शिवसेना आणि भाजपची युती होती. तेव्हा आदित्य ठाकरे हे तब्बल 67 हजार मतांनी विजयी ठरले होते. आता मात्र काही समीकरणं बदलली आहेत. संदीप देशपांडे हे मनसेचे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. तसंच शिंदे गटाकडून मिलिंद देवरा यांना तिकिट मिळाल्यास या मतदारसंघाचा निकाल सर्वांचंच लक्ष वेधून घेणारा असेल.