लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परभणीत मध्यरात्री हाय वोल्टेज ड्रामा घडला. परभणीत संजय जाधव विरुद्ध महादेव जानकर असा सामना आहे. राष्ट्रीय समाज पक्षाच्या महादेव जानकर यांना महायुतीने परभणीतून उमेदवारी दिली आहे. ठाकरे गटाचे संजय जाधव महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. परभणीत गुरुवारी मध्यरात्री मोठा वाद झाला. महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांची गाडी अडवून पीए आणि ड्रायव्हरला धमकावण्यात आल्याचा आरोप आहे. महादेव जानकरांनी हा आरोप केला आहे.
मध्यरात्री 1 ते 1.30 च्या सुमारास हा प्रकार घडला. महादेव जानकर एका कार्यकर्त्याच्या घरी जेवायला थांबले होते. त्यांचा पीए आणि ड्रायव्हर दुसऱ्या ठिकाणी जेवणासाठी चालले होते. त्यावेळी काही तरुणांनी त्यांची गाडी अडवली. गाडीतून पैसे वाटायला जातायत का? या संशयातून गाडीची तपासणी केली. गाडीतील कागदपत्र फाडण्याचा प्रयत्न झाला, असा आरोप महादेव जानकर यांनी केला आहे. हे तरुण खासदार संजय जाधव यांचे कार्यकर्ते असल्याचा महादेव जानकर यांचा आरोप आहे. या प्रकरणी महादेव जानकर यांनी नवा मोंढा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
महादेव जानकर काय म्हणाले?
घडलेल्या प्रकाराबद्दल बोलताना महादेव जानकर म्हणाले की, “आमदार साहेब ऑफिसमध्ये होते. मी, राजाभाऊ खोत आम्ही आतममध्ये बसलो होतो. बाहेरच्या ऑफिसमध्ये नगरगुट्टे साहेब बसलेले होते. माझ्या पीए आणि ड्रायव्हरला धमकावण्याचा प्रयत्न झाला. मी बऱ्याच निवडणुका पाहिल्या आहेत. लोकशाही मार्गाने निवडणूक झाली पाहिजे. हे योग्य नाही”
प्रदीप भालेराव कोण आहे?
रात्री उशिरा महायुतीचे नेते आणि कार्यकर्त्यांची पोलीस ठाण्यात गर्दी झाली होती. 12 ते 16 युवकांनी गोंधळ घातल्याचा जानकरांचा आरोप आहे. नवा मोंढा पोलीस ठाण्यात रात्री उशिरा प्रदीप भालेराव आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. प्रदीप भालेराव खासदार संजय जाधव यांचा कार्यकर्ता असल्याचा जानकर आणि आमदार गुट्टे यांचा आरोप आहे.