महायुतीचं जागा वाटप अजून झालेलं नाही. त्यामुळे या जागा वाटपाकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. तीन प्रमुख पक्ष किती जागा वाटून घेणार? मित्र पक्षांना किती जागा सोडणार? मित्र पक्षांना वेगळ्या जागा देणार की तिन्ही पक्षांनी आपआपल्या कोट्यातून मित्र पक्षांना जागा द्यायच्या? याबाबतची कोणतीच माहितीसमोर आलेली नाही. मात्र या बाबतचे फक्त कयासच वर्तवले जात आहेत. एकीकडे महायुतीतील नेते जागा वाटपाचा प्रश्न मार्गी लावण्याच्या तयारीत असतानाच महायुतीतील एका पक्षाच्या नेत्याने दंड थोपाटले आहेत. या नेत्याने स्वबळावर निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वच्या सर्व 288 जागा लढवणार असल्याचं या नेत्याने जाहीर केलं आहे.
राष्ट्रीय समाज पार्टीचे नेते महादेव जानकर यांनी महायुतीला सोडचिठ्ठी दिली आहे. राष्ट्रीय समाज पक्ष विधानसभा निवडणुकीत 288 जागांवर लढणार आहे. आम्ही महाराष्ट्रच नव्हे तर झारखंडमधीलही सर्वच्या सर्व जागा लढवणार आहोत. आमचा पक्ष दोन्ही विधानसभेच्या निवडणुका लढवण्यासाठी तयार आहे. आता माघार नाहीच, अशी गर्जनाच महादेव जानकर यांनी केली आहे. त्यामुळे महायुतीला मोठा फटका बसणार असल्याचं सांगितलं जात आहे.
लोकसभा निवडणुकीत मी परभणीतून लढलो. प्रचारासाठी मला अवघे 16 दिवस मिळाले. या 16 दिवसात मी 4 लाख मते घेतली. ही माझी ताकद आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचा पंतप्रधान झाला पाहिजे हे माझं स्वप्न आहे. आम्ही जातीवर राजकारण करत नाही. आम्हाला या देशाचे मालक बनायचे आहे. आम्ही सर्व समाजाला घेऊन जाणार आहोत. आता आम्ही माघारी वळणार नाही. 288 जागा लढवणार म्हणजे लढवणारच, असं महादेव जानकर म्हणाले.
महादेव जानकर यांनी राष्ट्रीय समाज पक्ष 288 जागेवर विधानसभा लढविणार असल्याची घोषणा केल्यावर राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर आणि भूम परांडामध्ये प्रचंड जल्लोष केला. राष्ट्रीय समाज पक्षाने तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून अश्रूबा कोळेकर तर भुम परंडा वाशी विधानसभा मतदारसंघातून नानासाहेब मदने यांची संभाव्य उमेदवार म्हणून उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे.
जानकर यांनी महायुतीतून बाहेर पडण्याची भूमिका घेतल्याने परभणीच्या गंगाखेड विधानसभेवर त्याचा थेट परिमाण होणार आहे. गंगाखेड विधानसभेचे एकूणच समीकरण जाणकरांच्या या निर्णयानंतर बदलणार आहे. महायुतीचा घटक म्हणून विधानसभेची तयारी करत असलेले राष्ट्रीय समाज पक्षाचे गंगाखेडचे विद्यमान आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या भूमिकेकडे आता सर्वांच्या नजरा लागून राहिलेल्या आहेत. गुट्टे महायुती सोबत जाणार की महादेव जानकर यांच्यासोबत राहणार की आणखीन काही निर्णय घेणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.