Mahayuti seat Sharing Formula (विनायक डावरुंग) | येत्या एक-दोन दिवसात लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊ शकतो. मात्र, त्याआधी अजून जागा वाटप निश्चित झालेलं नाहीय. महायुती आणि महाविकास आघाडी दोघांमध्ये अजूनही चर्चेच्या फेऱ्या सुरु आहेत. एखाद्या जागेवरुन कुठलाही पक्ष सहजासहजी आपला दावा मागे घ्यायला तयार नाहीय. त्यामुळे जाग वाटपाचा तिढा अजून सुटलेला नाही. पण आज किंवा उद्यापर्यंत महायुती आणि महाविकास आघाडीत जागा वाटप निश्चित होईल अशी अपेक्षा आहे. दरम्यान मुंबईसाठी महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला कसा असेल? सूत्रांच्या हवाल्याने याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे गट काही जागांवर दावा सोडायला तयार नाहीय. पण कोण निवडून येऊ शकतो? त्या आधारावर जागा वाटप व्हाव, यासाठी भाजपा आग्रही आहे. दरम्यान मुंबईत 5-1 चा फॉर्म्युला ठरला आहे. या फॉर्म्युल्यानुसार भाजपा पाच आणि शिवसेना शिंदे गटाला एक जागा मिळू शकते. सूत्रांनी ही माहिती दिलीय.
मुंबईत एकनाथ शिंदे गटाची ताकद जास्त नाहीय, त्यामुळे भाजपाकडून पाच जागांवर दावा सांगितला जातोय. त्यात भाजपा आपल्या तीन विद्यमान खासदारांच तिकीट कापू शकतो. मुंबईसाठी भाजपाच हे धक्कातंत्र आहे. उत्तर-मध्य मुंबईतून पूनम महाजन खासदार आहेत. त्यांच्याजागी आशिष शेलार यांना लोकसभेची उमेदवारी मिळू शकते. उत्तर मुंबईतून गोपाळ शेट्टी यांच्याऐवजी पियुष गोयल यांच्या नावाची चर्चा आहे. ईशान्य मुंबईतून मनोज कोटक यांच्याऐवजी पराग शाह यांना उमेदवारी मिळू शकते.
शिंदेंसोबत गेलेल्या या खासदाराची सीट धोक्यात
सध्या उत्तर पश्चिम मुंबईतून गजानन किर्तीकर खासदार आहेत. सध्या गजानन किर्तीकर एकनाथ शिंदेंसोबत आहेत. पण ही जागा भाजपाला मिळू शकते. भाजपाकडून उत्तर पश्चिम मुंबईसाठी अमित साटम यांचं नाव निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती आहे. दक्षिण मुंबईतून राहुल नार्वेकर यांच्या नावाची चर्चा आहे. सध्या परिसरात त्यांचे बॅनर्स सर्वत्र दिसत आहेत. त्यांचा सामना उद्धव ठाकरे गटाच्या अरविंद सावंत यांच्यासोबत आहे. दक्षिण मध्य मुंबईत राहुल शेवाळे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. एकनाथ शिंदे यांना ठाण्याची जागा मिळणार आहे. एकूणच शिंदे गटाला 12 ते 13 जागांवर समाधान मानाव लागू शकते. महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत.