महाराष्ट्रात आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे. यंदाच्या निवडणुकीत माहीम विधानसभा मतदारसंघ विशेष चर्चेत आहे. कारण माहिममधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे रिंगणात आहे. माहीममध्ये यंदा तिरंगी लढत होत आहे. शिवसेना शिंदे गटाकडून विद्यमान आमदार सदा सरवणकर, मनसेकडून अमित ठाकरे आणि उद्धव ठाकरे गटाकडून महेश सावंत निवडणूक रिंगणात आहेत. तिन्ही उमेदवारांनी आज प्रभादेवीच्या सिद्धी विनायक मंदिरात येऊन दर्शन घेतलं. प्रचारकाळात मनसे आणि सदा सरवणकर यांच्यामध्ये मोठी कटुता आली होती. पण आज दोन्ही उमेदवारांनी सिद्धीविनायकाच दर्शन घेतल्यानंतर परस्परांशी हस्तांदोलन केलं.
उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत हे सुद्धा सिद्धीविनायकाच दर्शन घेतल्यानंतर TV9 मराठीशी बोलले. “मतदार सूज्ञ आहेत. दादरचे मतदार हे विचारपूर्वक मतदान करतात. इथे कोणाच्या ओघात, प्रेमाखातर जात नाही. जो खरोखर काम करतो, जो उपलब्ध असतो, वेळ बघत नाही, लोकांची सेवा करतो, त्याला लोक निवडतात. लोकांची भावना एवढीच आहे की, घातलेल्या कपड्यानिशी उद्धव ठाकरे साहेबांना बेदखल केलं, या गद्दार आमदारामुळे त्यांच्या ह्दयाला ठेस पोहोचली आहे. उद्धव, बाळासाहेब यांच्या नावाने त्याची पोचपावती मतदार देतील” असं महेश सावंत म्हणाले.
महेश सावंत यांच्या पत्नी काय म्हणाल्या?
यावेळी महेश सावंत यांच्यासोबत त्यांच्या पत्नी आणि मुलगा सुद्धा होता. त्यांच्या पत्नी म्हणाल्या की, “महेश सावंत यांचा विजय निश्चित विजय आहे. आम्ही कुटुंब म्हणून सोबत आहोत. आम्ही चांगली तयारी केली आहे. सगळे शिवसैनिक, दादर-प्रभादेवीतील जनता आमच्यासोबत आहे. आम्हाला न्याय देतील, आम्हाला पाठिंबा मिळेल असा विश्वास व्यक्त केला”