मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपूत्र अमित ठाकरे यांनी माहीम विधानसभा मतदारसंघात प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यांच्यासमोर शिवसेना शिंदे गटाचे सदा सरवणकर आणि उद्धव ठाकरे गटाचे महेश सावंत यांचं आव्हान आहे. आज मीडियाने अमित ठाकरे यांच्याशी संवाद साधला. पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात आहात, तिरंगी लढत होणार आहे. किती आव्हान आहे? तुमच्यासमोर. यावर अमित ठाकरे म्हणाले की, “माझ्यासाठी आव्हान नाही. कोणी समोर असेल किंवा नसेल, माझे प्रयत्न तसेच असणार आहेत. माझा डोअर टू डोअर प्रचारावर भर आहे. त्यापेक्षा अधिक काही करु शकत नाही”
“यापुढे 15 ते 20 दिवस डोअर टू डोअर लोकांना जाऊन भेटण्याची इच्छा आहे. मी रॅलीवर विश्वास ठेवत नाही. एखाद-दोन प्रचारसभा घेईन. लोकांपर्यंत पोहोचण्याचा माझा प्रयत्न आहे. त्यांना सांगयचय, माझं व्हिजन काय आहे. कोणाला मतदान करणार हे लोकांना समजलं पाहिजे” असं अमित ठाकरे म्हणाले. “एका घरी गेलो ते म्हणाले असा प्रचार याआधी कधी झाला नाही. आमच्याकडे कधी कोण आलच नाही. मला वाटत लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. कोणाला मतदान करतोय हे लोकांना कळलं पाहिजे” असं अमित ठाकरे म्हणाले.
‘मला प्रत्येक घरात जायची गरज नाही’
सदा सरवणकरांना याबद्दल विचारल्यानंतर ते म्हणाले की, “आम्ही प्रचाराला सुरुवात केली आहे. मी 365 दिवस लोकांच्या दारात असतो. त्यामुळे मला प्रत्येक घरात जायची गरज नाही. आता ज्यांना ओळखत नाहीत, ते जात आहेत. त्यांना माझ्या शुभेच्छा” “अमित ठाकरेंनी आधी आमदार व्हावं, मग बोलल्यानंतर योग्य ठरेल. त्यांना खूप काही शिकायचं आहे. मग, त्यांनी अशा प्रकारे मत व्यक्त करणं योग्य ठरेल” असं सदा सरवणकर म्हणाले.