मोठी बातमी, इंडिया आघाडीला मोठ खिंडार, ममता बॅनर्जी फुटल्या

| Updated on: Jan 24, 2024 | 12:50 PM

इंडिया आघाडीतून पहिली विकेट पडली आहे. मागच्या काही दिवसांपासून जागा वाटपावरुन बोलणी सुरु होती. पण ही बोलणी कमी आणि वादविवाद जास्त वाटत होता. त्यामुळे अखेर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एकला चलोरेचा निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेससाठी हा झटका आहे. कारण लोकसभा निवडणुकीत जास्त जागा जिंकण्याच्या काँग्रेसच्या इराद्याला धक्का बसला आहे.

मोठी बातमी, इंडिया आघाडीला मोठ खिंडार, ममता बॅनर्जी फुटल्या
Follow us on

नवी दिल्ली : काँग्रेसप्रणीत इंडिया आघाडीला मोठा झटका बसला आहे. इंडिया आघाडीच्या कळपातून पहिला पक्ष बाहेर निघालाय. तृणमुल काँग्रेसच्या प्रमुख पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीला झटका दिला आहे. त्यांनी पश्चिम बंगलामध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी त्यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली. काँग्रेसने TMC चा प्रस्ताव मानला नाही, म्हणून हा निर्णय घेतला असं ममता बॅनर्जी यांनी सांगितलं. टीएमसी आणि काँग्रेसमध्ये मागच्या काही दिवसांपासून जागावाटपावरुन वादविवाद सुरु होते. ज्यावेळी दोन्ही पक्षांमध्ये एकमत झालं नाही, त्यावेळी TMC ने एकट्याने लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. लोकसभा निवडणुकीआधी इंडिया आघाडीची पहिली विकेट पडली आहे. पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या 42 जागा आहेत.

काँग्रेस पक्षासोबत माझ कुठलीही चर्चा झाली नाही असं ममता बॅनर्जी यांनी सांगितलं. “पश्चिम बंगालमध्ये आम्ही एकट्याने निवडणूक लढवणार हे सुरुवातीपासून आम्ही सांगत आलोय. आमची एक धर्मनिरपेक्ष पार्टी आहे” असं त्या म्हणाल्या. “आम्ही स्वबळावर भाजपाला हरवू शकतो, मी इंडिया आघाडीचा भाग आहे. राहुल गांधी यांची न्याय यात्रा आमच्या राज्यातून जाणार आहे. पण त्या बद्दल आम्हाला सांगण्यात आलेलं नाही” असं त्या म्हणाल्या.


चर्चा कुठे फिस्कटली?

जागा वाटपावरुन काँग्रेस आणि टीएमसीमध्ये एकमत झालं नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेसकडून 10 ते 12 जागांची मागणी करण्यात येत होती. पण टीएमसी केवळ दोन जागा द्यायला तयार होती. काँग्रेसला हे मान्य नव्हतं. बस, चर्चा इथे फिस्कटली. 2019 लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने बहरामपूर आणि मालदा दक्षिण या दोन जागा जिंकल्या. त्या दोन जागांची टीएमसीकडून मागणी सुरु होती. पण काँग्रेस त्यासाठी तयार नव्हती. त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी तृणमुल काँग्रेस राज्यातील सर्व 42 जागांवर लोकसभा निवडणूक लढवेल, हे जाहीर केलं.