मुंबई : पश्चिम बंगालमधील (West Bengal) सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेसनं (Trinamool Congress) गोवा विधानसभा निवडणुकीत सक्रीय सहभाग घेतल्यानंतर टीएमसीच्या सर्वेसर्वा आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) तीन दिवसीय मुंबई दौऱ्यावर येत आहेत. राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांचा मुंबई दौरा महत्वाचा मानला जात आहे. ममता बॅनर्जी आपल्या मुंबई दौऱ्यात उद्योगपतीची बैठक घेणार आहेत. तसंच सत्ताधारी महाविकास आघाडीतील नेत्यांच्याही गाठीभेटी त्या घेणार असल्याची माहिती मिळतेय.
ममता बॅनर्जी तीन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावेळी त्या राज्यातील उद्योगपतींच्या भेटीगाठी घेणार असल्याची माहिती मिळतेय. त्याचबरोबर त्या सत्ताधारी महाविकास आघाडीतील नेत्यांच्याही भेटीगाठी घेणार आहेत. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्याशी आज सायंकाळी त्यांची ट्रायडेंट हॉटेलमध्ये भेट होणार आहे. तसंच उद्या त्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची ‘सिल्व्हर ओक’वर जाऊन भेट घेणार आहेत. तर उद्या दुपारी चार वाजता त्यांची मुंबईतील उद्योगपतींसोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे. खासदार संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत हिच्या लग्नाच्या रिसेप्शनलाही त्या उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसंच ममता बॅनर्जी या प्रसारमाध्यमांशीही संवाद साधू शकतात आणि आपल्या मुंबई दौऱ्याचं फलित प्रसारमाध्यमांपुढे मांडू शकतात, अशी माहिती मिळत आहे.
दरम्यान, संजय राऊत यांनी ममता बॅनर्जी यांच्या मुंबई दौऱ्याबाबत ट्विटरवरुन माहिती दिलीय. ‘पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मुंबईत आहेत. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांना उद्धव ठाकरे यांची भेट घ्यायची होती. पण आरोग्यासंबंधी काही बंधनांमुळे उद्धव ठाकरे यांची भेट होत नाहीत. अशावेळी मी आणि आदित्य ठाकरे संध्याकाळी साडे सात वाजता ममताजी हॉटेल ड्रायडंट येथे भेटणार आहेत’, असं ट्विट राऊत यांनी केलंय.
WB CM @mamatabanerjee is in Mumbai. She has inquired on CM Uddhav Thackeray’s health. She wanted to meet CM, but due to health restrictions the meet is not happening. However myself and @authackeray will be seeing Mamata ji at Trident at 7.30 pm.
— Sanjay Raut (@rautsanjay61) November 30, 2021
ममता बॅनर्जींच्या अजेंड्यावर दुसरी मोठी भेट ही मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत होती. मात्र, मुख्यमंत्री ठाकरे हे हॉस्पिटलमध्ये आहे. त्यामुळे ही भेट होणार नसल्याचं आता संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. नरेंद्र मोदी सरकारच्याविरोधात गेल्या दोन एक वर्षात जर कुणी पाय रोवून उभं ठाकलं असेल तर ते आहेत ममता बॅनर्जींची टीएमसी आणि ठाकरेंची शिवसेना. दोन्ही ठिकाणी केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन राज्य सरकारांना नामोहरम करण्याचा प्रयत्न मोदी सरकार करत असल्याचा आरोप केला जातोय. पण तरीही ठाकरे-बॅनर्जींनी भाजपला जशास तसं उत्तर दिलंय. त्याच पार्श्वभूमीवर ह्या दोन्ही नेत्यांची भेट महत्वाची मानली जात होती.
इतर बातम्या :