मुंबई: थोड्याच वेळात मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) होणार आहे. या विस्तारात शिंदे गटाकडून फक्त माजी मंत्र्यांनाच संधी दिली जाणार आहे. तर अपक्षांना तूर्तास वेटिंगवर ठेवण्यात येणार आहे. भाजपनेही या विस्तारात मित्र पक्ष आणि अपक्षांना मंत्रिमंडळ विस्तारापासून दूर ठेवलं आहे. भाजपने (bjp) केवळ माजी मंत्री आणि अनुभवी नेत्यांनाच मंत्रिपदे देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातही भाजपने आगामी महापालिका निवडणुकीचं गणित लक्षात घेऊन मंत्रीपदे देण्याचा निर्णय घेतला आहे. जळगावमधून गिरीश महाजन, गडचिरोलीतून सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील आणि मुंबईतून मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांना मंत्रिपद देण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. मंगलप्रभात लोढा हे भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आहेत. मुंबई महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी भाजपने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यामुळेच मंगलप्रभात लोढा यांना मंत्रिपद देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
मंगलप्रभात लोढा हे मूळचे राजस्थानचे आहे. ते महाराष्ट्रातील श्रीमंत बिल्डरांपैकी एक आहे. तसेच दक्षिण मुंबईत त्यांचं वर्चस्व आहे. या सर्व गोष्टींचा विचार करूनच त्यांना मंत्रिपद देण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. मंगलप्रभात लोढा हे राजस्थानचे असले तरी राजस्थानी, गुजराती आणि मराठी मतदारांमध्येही ते लोकप्रिय आहेत. तसेच दक्षिण मुंबईत त्यांचं मोठं काम आहे. त्यामुळे दक्षिण मुंबईवर वर्चस्व मिळवण्यासाठी भाजपने लोढा यांच्या माध्यमातून रणनीती आखली आहे. त्याला आता कितपत यश येतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
मंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी मंगलप्रभात लोढा यांनी मीडियाशी संवाद साधला. मला मंत्रिपदाची संधी देण्यात आली आहे. मी मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी चाललो आहे. पक्षाने दिलेली जबाबदारी मी पूर्ण पार पाडणार आहे, असं लोढा यांनी सांगितलं.
दरम्यान, शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. शिवसेनेच्या 40 आमदार आणि 12 खासदारांनी बंड केल्याने शिवसेनेची मोठी पडझड झाली आहे. बंडखोरांमध्ये मुंबईतील आमदार, खासदार आणि काही नगरसेवकही आहेत. त्यामुळे शिवसेनेचं संघटन खिळखिळं झालं आहे. या संधीचा भाजपने फायदा उचलण्याचं ठरवलं आहे. त्याचाच एक भाग म्हणून मंगलप्रभात लोढा यांना मंत्रिपद दिल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे लोढा यांना मुंबई जिंकण्यात किती यश येतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.