यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात सध्या राजकीय वातावरण तापले आहे. लोकसभेचं बिगुल वाजलं आहे. काँग्रेस आणि शिवसेना या प्रमुख लढत असलेल्या पक्षांचे उमेदवार जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे मतांवर डोळा ठेवून नेते कामाला लागले आहेत. सध्या जिल्ह्यात एका पालखीची जोरदार चर्चा आहे. पालखी जरी धार्मिक असली तरी किनार मात्र त्याला आपसूकच राजकीय लाभली आहे.
एकमेकांचे वरवर कट्टर राजकीय विरोधक दिसणारे दोन नेते या पालखीने एकत्र आणले. आता हे पालखीमुळे आले की राजकीय स्वार्थ आणि शह काटशह समोर ठेवून आले. हे लोकांना चांगलेच ठावूक आहे. हे दोन नेते म्हणजे काँग्रेस नेतेचे माजी मंत्री माणिकराव ठाकरे आणि सेनेचे मंत्री संजय राठोड होत. हे दोनही नेते लोकांना जवळ करण्याची कुठलीही संधी सोडत नाहीत. निमंत्रण असो वा नसो कार्यकर्ते त्यांना सिग्नल देतात की, भाऊ यावंच लागते. त्यामुळेच हे दोनही नेते लोकांच्या भेटी गाठी घेत राहतात.
एकेकाळी दिग्रस मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला होता. हा बालेकिल्ला आता सेनेचा गड झाला आहे. माणिकराव ठाकरे यांना चीत करुन संजय राठोड इथून आमदार आणि आता मंत्री झालेत. प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर माणिकराव ठाकरे यांनी या मतदारसंघाकडे फारसे लक्ष दिले नाही. आता मात्र लोकसभा निवडणूक असल्याने आणि माणिकराव ठाकरे यांची जवळपास उमेदवारी निश्चित झाल्याने त्यांनी जनसंपर्क वाढविला आहे. याचाच एक भाग म्हणून काल परवा मुंगसाजी महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने हे दोनही नेते एकत्र आले. दोन्ही नेते मुगसाजी महाराजचे मोठे भक्त आहेत. नुसतेच एकत्र आले नाही, तर त्यांनी चक्क पालखी आपल्या खांद्यावर घेतली. त्यातही माणिकराव समोर आणि संजय राठोड मागे होते.
सध्या संजय राठोड आणि भावना गवळी यांच्यामधून विस्तव जात नाही, हे सर्वश्रुत आहे. एकमेकांच्या बॅनरवर फोटो सुद्धा नसतात, इथवर गट पडले आहेत. त्यातच लोकसभा निवडणूक समोर आली आहे. भाऊ तुम्ही समोर व्हा, मी तुमच्या पाठीशी आहे, असे तर संजय राठोड यांना सुचवायचे नसेल? काही नवे राजकीय समीकरण तर यात नसेल? धार्मिक पालखी अचानक राजकीय स्वरुप धारण करु लागल्याने ही पालखी आता नव्या चर्चेला तोंड फोडणारी ठरली आहे.