“मी कोणताच मुद्दा घेऊन लोकांमध्ये जात नाही. लोक कोणताच मुद्दा विचारतही नाहीत, आणि मी ज्या वेळी निवडणूक लढवतो, त्या प्रत्येक निवडणुकीत माझे मत वाढतच जाते. ज्याला उभे राहायचे असेल, त्याने येथून उभे राहावे. मात्र येथील जनता आपल्याला मत देणार नाही हे भाजपला गेल्या वेळी कळले” असं अबू असीम आझमी म्हणाले. ते शिवाजीनगर मानखुर्द येथून विधानसभा निवडणूक लढवत आहेत. त्यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नवाब मलिक यांचं आव्हान आहे. नवाब मलिक यांनी या मतदारसंघात ड्रग्जचा मुद्दा घेतला आहे. “भाजपाने अशी योजना आखली की, जर त्यांना मते मिळाली नाहीत तर मतांची विभागणी करा. हा त्यांचा प्रयत्न आहे. परंतु मला आशा आहे की ते मतांचे विभाजन करणार नाहीत आणि जनता आम्हाला विजयी करेल” असं अबू असीम आझमी म्हणाले.
“नवाब मलिक यांनी जे काही आरोप केले ते खोटे आहेत. येथे मोठे रुग्णालय आहे. मुंबईत महापालिकेची सर्वात मोठी शाळा येथे बांधली जात आहे. सीबीएसई बोर्डाची शाळा आहे. गरीब मुलांसाठी शाळा आहे आणि मी स्वतः शाळा उघडत आहे. ड्रग्जचा आरोप करणाऱ्याला विचारा, त्याच्या कुटुंबात काय चालले आहे, त्याच्या जावयाला का अटक करण्यात आली?नवाब मलिक सत्तेवर असताना समीर वानखेडेबद्दल खूप ओरडत होता, त्यानंतर काय झालं?. तुमचा मुलगा काय करतो ते मी सांगू का?” असा इशारा अबू असीम आझमी यांनी दिला.
‘मी कोणाच्याही विरोधात प्रचार करणार नाही’
“नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांबाबत मी न्यायालयात जाणार आहे. नवाब मलिकला आजारपणामुळे जामिन मिळाला असून ते मीडियासमोर जाऊ शकत नाहीत” असं आझमी म्हणाले. “महाविकास आघाडीतील नेत्यांना त्यांच्या इच्छेनुसार ते येवो अथवा न येवो, मी त्यांना फोन करेन. महविकस आघाडीच्या नेत्यांनी मला फोन करून बोलले असते तर मी कितीही जागांवर सहमती दिली असती. पण त्यांनी ना मला विचारले ना माझ्याशी बोलले. सध्या मी 8 जागांवर लढत आहे” असं आझमी म्हणाले. “गोरक्षणाच्या नावाखाली मुस्लिमांना निर्वस्त्र करून ठार मारले जाईल, असे यापूर्वी घडले नाही, म्हणून मी महाविकस आघाडी सोबत राहणार आहे. मी कोणाच्याही विरोधात प्रचार करणार नाही” असं अबू आझमी म्हणाले.