मुंबई | 23 फेब्रुवारी 2024 : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू, शिवसेनेचा चाणक्य, पक्षाचा सुवर्णकाळ पाहिलेल्या मनोहर जोशी यांच निधन झालं आहे. वयाच्या 86 वर्षी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी अखेरचा श्वास घेतला. पण एककाळ असा होता जेव्हा शिवसेना पक्षातील अनेक महत्त्वाच्यां निर्णयांमागे मनोहर जोशी यांचे विचार असायचे. बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मनोहर जोशी यांनी राजकारणातील धडे गिरवले. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जेव्हा मनोहर जोशी यांची भेट घेतली. तेव्हा राजकारत चर्चा सुरु झाली. युती तुटल्यानंतर ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकत्र यावं अशी इच्छा मनोहर जोशी यांनी व्यक्त केली होती.
पुण्यातील एका कार्यक्रमात मनोहर जोशी यांना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या सुरु असलेल्या चर्चांवर विचारण्यात आलं. तेव्हा मनोहर जोशी म्हणाले, ‘ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकत्र यावं अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. पण फक्त कार्यकर्त्यांची इच्छा असणं महत्त्वाचं नाही. ठाकरे बंधूंची देखील इच्छा असणं तितकच महत्त्वाचं आहे…’
पुढे मनोहर जोशी म्हणाले होते, ‘दोघांनी एकत्र यावं यासाठी मी मध्यस्थी करणार नाही. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची एकत्र येण्याची इच्छा आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा इतिहास घडेल. त्यासाठी दोघांनी इच्छा असणं महत्त्वाचं आहे…’ असं देखील मनोहर जोशी म्हणाले होते. मनोहर जोशी यांचं हे वक्तव्य कधीही विसरता न येणारं आहे.
मनोहर जोशी यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, शिवसेनेचे संस्थापक आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निकटवर्तीयांपैकी ते एक होते. बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री बनवले. 1995 मध्ये महाराष्ट्राचे ते पहिले गैरकाँग्रेसी मुख्यमंत्री झाले. मनोहर जोशी यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत मुंबईचे महापौरपद, राज्याचे मुख्यमंत्रीपद आणि लोकसभेचे अध्यक्ष अशी प्रतिष्ठित पदे भुषविली होती. पण आज त्यांचं निधन झाल्यामुळे सर्वांना मोठा धक्का बसला आहे.