मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी पुढच्या महिन्यात पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार उपसणार आहेत. पुढच्या महिन्यातील त्यांचं उपोषण हे शेवटचं उपोषण असणार आहे. म्हणजे जरांगे हे आरपारची लढाई करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे मनोज जरांगे यांच्या या आंदोलनाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळावं आणि सगेसोयऱ्यांना आरक्षण देण्याची अंमलबजावणी करावी या दोन मुद्द्यांवर त्यांचा भर असणार आहे. मात्र, त्यापूर्वीच जरांगे यांनी एक मोठं आणि खळबळजनक विधान केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
मनोज जरांगे पाटील हे धाराशिवमध्ये होते. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे बडे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केला आहे. देवेंद्र फडणवीसांमुळेच सग्यासोयऱ्यांचा मुद्दा प्रलंबित आहे. फडणवीस सगेसोयऱ्यांचा मुद्दा मार्गी लागू देत नाही. राज्यातील मंत्र्यांनाही फडणवीस काम करू देत नाहीत. त्यामुळे सगेसोयऱ्याचा मुद्दा पेंडिंग आहे. पण त्यांचं हे षडयंत्र आम्ही 2024च्या विधानसभा निवडणुकीत हाणून पाडू, असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या विधानावर तीव्र नाराजी व्यक्त केली. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. त्यांच्याबद्दल असं विधान करणं चुकीचं आहे. स्वत: तानाजी सावंत हे शेतकरी कुटुंबातून आलेले आहेत. त्यांनी तरी असं बोलायला नको होतं, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
दरम्यान, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर तुम्ही कधी आंदोलन करणार? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांना करण्यात आला. त्यावर जरांगे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 2024 मध्ये या सरकारला पायाखाली घेतल्याशिवाय पर्याय नाही. आता आम्ही जे सुरू केलंय तेच शेतकऱ्यांचं आंदोलन आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
मनोज जरांगे पाटील हे जालन्याच्या अंतरवली सराटीतून मालवणकडे निघाले आहेत. त्यांचा ताफा धाराशिवमध्ये आला होता. यावेळी सकल मराठा समाजाकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला. या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी जरांगे उद्या मालवणला जात आहेत. यावेळी त्यांच्यासोबत असंख्य मराठा आंदोलक असणार आहेत. उद्या मालवणमध्ये गेल्यानंतर जरांगे काय बोलणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलं आहे.