देवेंद्र फडणवीस यांना शेवटची संधी, त्यानंतर… मनोज जरांगे आक्रमक; इशारा काय?

| Updated on: Sep 22, 2024 | 11:47 AM

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. आजही त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे. मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी फडणवीस यांना ही शेवटची संधी आहे, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांना शेवटची संधी, त्यानंतर... मनोज जरांगे आक्रमक; इशारा काय?
manoj jarange patil
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. फडणवीस यांच्यामुळेच मराठा आरक्षण रखडल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे. मी फक्त राजकारणात जायचं नाही म्हणून आमरण उपोषणाला बसलो आहे. ही फडणवीस यांना शेवटची संधी आहे. मराठ्यांच्या मागण्यांची अंमलबजावणी केली पाहिजे. संधी देऊनही आरक्षण दिलं नाही तर त्यांना तोंडही उघडता येणार नाही. लोक फडणवीस यांनाच दोषी धरणार आहे. संधी देऊनही अंमलबजावणी करत नाही. म्हणजे दोषी फडणवीस आहेत. मराठ्यांचं वाटोळं करायला फडणवीस निघाले आहेत. हे सर्व पक्षातील मराठे एक दिलाने म्हणणार आहेत. हे उपोषण फक्त फडणवीस यांच्यासाठी आहे. फडणवीस एक दोन दिवसात मागण्या मान्य करतील अशी आशा आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. यावेळी ते मीडियाशी संवाद साधत होते. मराठा समाजाला अन्याय सहन होत नाही. प्रचंड अन्याय होत आहे. सरकारमधून ठरवून अन्याय सुरू आहे. मराठ्यांना आता अन्यायच सहन होत नाही. मी रोज शांततेचं आवानह करत आहे. पण समोरूनही तसा प्रतिसाद आला पाहिजे. याला ओबीसी-मराठा असं नाव देऊ नका. मराठा- ओबीसींच्या अंगावर जात नाही. ओबीसी- मराठ्यांच्य़ा अंगावर जात नाही. हे भुजबळांचं नाटक आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

भुजबळांची नौटंकी

भुजबळ ओबीसींसाठी लढत नाहीत. ते फक्त भांडण करत आहेत. तीन वेळा ते रॅली काढायला अंतरवलीत आले. तीनदा आले. पण मराठे काही बोलले नाही. ते भांडणं करण्यासाठी आले होते. पण आम्ही आलो नाही. हे जातीयवादी आहेत. भुजबळ हे नाच्या आहेत. त्यांची नौटंकी सुरू आहे. पण आम्ही त्यांना बधणार नाही. त्यांची नौटंकी खपवून घेणार नाही, असंही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं.

आळंदी बंद

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुण्याच्या आळंदीमध्ये आज बंद पुकारण्यात आला आहे. या बंदला आळंदीकरांनी चांगलं प्रतिसाद दिला आहे. सकाळपासून अनेक दुकानं बंद होती. सकल मराठा समाजाकडून जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी हा बंद पुकारण्यात आला होता. तर शहरातून पदयात्रा काढून बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत होते.

जालन्यात शांतता

अखंड मराठा समाजाकडून आज जालना बंदीची हाक देण्यात आली आहे. सकाळपासून जालन्यात तणावपूर्ण शांतता पाहायला मिळत आहे. वडीगोद्रीमध्ये ओबीसींच आंदोलन सुरू आहे. आंदोलनाचा आजचा त्यांचा चौथा दिवस आहे. काल हायव्होल्टेज ड्रामा झाल्यानंतर पोलिसांनी सतर्कता म्हणून सकाळपासूनच बंदोबस्त वाढवला आहे. अंतरवाली सराटीकडे जाणारे सर्वच रस्ते बंद करण्यात आले आहेत. वाहतूक सेवा वळविण्यात आली आहे. वडीगोद्री चौकात पोलिसांची ज्यादा कुमक ही लावण्यात आलेली आहे. काल घडलेल्या प्रकारासारखा कुठलाही अनुचितप्रकार आज घडू नये यासाठी पोलीस सर्वतोपरी सतर्क असल्याचं पाहायला मिळत आहे.