मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. मराठा आरक्षणावरून देवेंद्र फडणवीस यांना घेरलेलं असतानाच मनोज जरांगे यांनी आता फडणवीस यांच्यावर नवा आरोप केला आहे. फडणवीस यांनी गोड बोलून धनगर आरक्षण मोडून काढलं, असा खळबळजनक आरोपच मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यावर फडणवीस काय उत्तर देतात याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
बीड येथील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर घोंगडी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला संबोधित करताना मनोज जरांगे पाटील यांनी हा आरोप केला आहे. देवेंद्र फडणवीस यानी माझी एसआयटी चौकशी लावलीय. तिकडे 70 हजारवाले चोर आहेत. त्यांची एसआयटी लावायची सोडून माझी एसआयटी लावली आहे. फडणवीस यांनी जो ट्रॅप लावला आहे, त्यात मी मेलो तरी बदलणार नाही, असं सांगतानाच आपल्याला आरक्षण नाही मिळालं तर सरकारचा सुपडा साफ करायचा आहे, असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं आहे.
फडणवीस यांनी नवीन नवीन आमदार उभे केले. फडणवीस यांच्या माध्यमातून यांना त्यांच्या संपत्ती सांभाळायची आहे. पण फडणवीस साहेब मराठे तुम्हाला लोळवल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही आरक्षण दिलं नाही तर तुमचे 113 उमेदवार घरी गेलेच म्हणून समजा. गोरगरीब मराठ्यांनी आता जागं व्हावं. मार खायची वेळ आली तर का. केस झाली तर होऊ द्या. पण मागे हटू नका, असं आवाहनच त्यांनी केलं.
माझ्या विरोधात खूपजण उठले आहेत. दर आठवड्याला आमदार बदलत आहेत. नगरला कसे बैल बदलत आहेत, तसे आमदार बदलत आहेत. हे दोन तीन महिने सावध राहा, बेसावध राहू नका. उद्यापासून एक काम करा, गावात मराठा सेवकांची टीम करा, यातून मराठा समाजाचे प्रश्न सोडावा. गरीब मराठ्यांना काम पडलं तर त्याने ते सांगायचं कोणाला? म्हणून हक्काची मराठा सेवक अशी टीम करा. या टीमकडून काम झालं नाही तर तालुक्याच्या ठिकाणावर होईल, तिथं नाही झालं तर जिल्ह्याच्या ठिकाणी होईल, असंही त्यांनी सांगितलं.