आमदार व्हायचंय… जरांगे यांच्याकडे 800 उमेदवारांचे अर्ज; सर्वाधिक अर्ज कोणत्या भागातून?

| Updated on: Aug 24, 2024 | 5:36 PM

30 सप्टेंबरच्या आतच कर्जमुक्ती करून पीकविम्यासह अनुदानाचा विषय सरकारने क्लिअर करावा. जर सरकारने हा विषय क्लियर केला नाही तर राज्यातील शेतकऱ्यांना, सर्व जाती धर्मातील लोकांना, मराठ्यांना सांगतो की, एक शिक्का चालायचं, शंभर टक्के मतदान चालवायचे आणि यांना घरी पाठवायचे, असं आवाहनच मनोज जरांगे यांनी केलं.

आमदार व्हायचंय... जरांगे यांच्याकडे 800 उमेदवारांचे अर्ज; सर्वाधिक अर्ज कोणत्या भागातून?
manoj jarange patil
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मनोज जरांगे पाटील यांनी आता विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय पक्का केलेला दिसत आहे. त्यांनी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवायला सुरुवात केली आहे. अनेकांनी भेटून त्यांच्याशी चर्चाही केली आहे. त्यात माजी आमदार, विद्यमान आमदार आणि इतर मातब्बर नेत्यांचा समावेश आहे. अनेक बड्या पक्षातील लोकही मनोज जरांगे पाटील यांच्याकडून लढण्यास तयार आहेत. मनोज जरांगे यांच्याकडे आतापर्यंत 800 इच्छुकांनी अर्ज दिले आहेत. या सर्वांना आमदार व्हायचं आहे. मनोज जरांगे पाटील यांनीच हा आकडा आज जाहीर केला आहे. या आकड्यावरून मनोज जरांगे यांची लोकप्रियता किती आहे हे दिसून येत आहे.

मनोज जरांगे यांनी मीडियाशी संवाद साधताना ही माहिती दिलीय. आमच्याकडे इच्छुकांचा मोठा डेटा आहे. सुमारे 700 ते 800 जणांनी अर्ज केले आहेत. या सर्व अर्जांची छाननी होईल. तज्ज्ञांची समिती हे काम करेल. पश्चिम महाराष्ट्रातून सर्वाधिक अर्ज आले आहेत. तर मराठवाडा, विदर्भातूनही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पण कोकण आणि मुंबई विभागातून कमी अर्ज आले आहेत. अर्ज येतच आहेत. त्यामुळे इच्छुकांचे अर्ज स्वीकारण्याची तारीख वाढवायची की नाही हे ठरवायचे आहे, असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं.

29 तारखेला चर्चासत्रं

येत्या 29 तारखेला आंदोलनाला एक वर्ष पूर्ण होत आहे. माझ्या मायबाप मराठा समाजाने ताकदीने हे आंदोलन लावून धरले होते. त्यामुळेच आंदोलन यशस्वी झालं आहे. या यशाचं श्रेय हे मराठा समाजाच्या एकजुटीला आहे. त्यामुळे येत्या 29 तारखेला अंतरवलीत एक छोटेखानी चर्चा सत्र ठेवू. कारण हे आंदोलन ऐतिहासिक झालेलं आहे. आंदोलनाचा लढा सर्वांनी यशस्वी केला आहे. त्याचे श्रेय सर्व गोरगरीब मराठा समाजाला आहे, असं मनोज जरांगे म्हणाले.

ही राजकीय बैठक नाही

आज मराठा समाजाच्या कानावर काहीही आलं तरी लाखोंच्या संख्येने मराठा समाज अंतरवलीला येतो. माझ्या समाजाच्या चरणी मी नतमस्तक होतो. एका हाकेवर हा समाज येतो. त्यामुळेच मला लढायचं बळ मिळतं. येत्या 29 तारखेला ज्यांना शक्य आहे, त्यांनी अंतरवलीत यावं. फक्त कामे बुडवून येऊ नका. थोड्या संख्येनेच या. मी काही जाहीर आवाहन करत नाही. कारण छोटा कार्यक्रम घेत आहोत. शेतीची कामे खोळंबू नये म्हणून कार्यक्रम छोटाच करणार आहोत. ही कोणतीही राजकीय बैठक नाही, फक्त एक वर्ष पूर्ण झाले म्हणून छोटेखानी चर्चासत्र आपण घेऊ, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

आम्ही ठेका घेतला नाही

मी जातीवाद करत नाही. मी कोणत्या गोरगरीब ओबीसीला, धनगर बांधवांना, मुस्लिम बांधवांना, बारा बलुतेदारांना दुखावलं नाही. फक्त नेत्याला सोडत नाही. आमच्या आणि त्यांच्या सुद्धा नेत्यांना सोडत नाही. शेतकऱ्यांचा मुद्दा का घ्यायचा नाही? कारण मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. आमच्या शेतकऱ्यांचे काय प्रश्न असतात हे आम्हाला माहीत आहेत. 30 सप्टेंबरच्या आत सगळी कर्जमाफी केली पाहिजे. राज्यात अनुदानही मिळाले पाहिजे. पीक विमा सुद्धा मिळाला पाहिजे. एखाद्या मुद्द्यावर ठाम झालो तर मी कोणाच्या बापाला भीत नाही. माझा शेतकरी बाप जगला पाहिजे, आम्ही तुमचा ठेका घेतलेला नाही, अशा शब्दात त्यांनी सत्ताधाऱ्यांना फटकारले.

फुकट देत नाही

माझा मराठा समाज एकटाच 50-55% आहे. तुम्ही आमचे काम करा. तुम्ही सगळे प्रश्न काढून ठेवले आहेत. कामगारांचे प्रश्न, डॉक्टरांचे प्रश्न, वकिलांचे प्रश्न, शिक्षकांचे प्रश्न, पोलिसांचे प्रश्न, शहीद कुटुंबाचे सगळे प्रश्न अडकून ठेवलेले आहेत. सत्ता चालवत आहेत आणि गोरगरिबांचे रक्त पीत आहेत. फक्त थोडी चिरीमिरी देतात, आमच्या आयुष्याची सुविधा थोडीच देता. थोडेच देता आणि काढतात खूप. देताना तुम्ही तुमच्या खिशातून देत नाही, आमच्या टॅक्समधून पैसे काढूनच देता, असंही ते म्हणाले.

त्यांना उलटं टांगून हाणा

तुम्ही लोकांच्या आयुष्यांचे वाटोळे करायला निघाले आहात का? तुम्ही शेतकऱ्यांना एक रुपयाचे कर्ज देऊ नका, आमच्या फक्त दोन-तीन गोष्टी द्या. आमच्या लोकांना कायमचं पाणी उपलब्ध करून द्या, लाईट द्या आणि आमच्या मालाला भाव द्या, तुमचे कर्ज, अनुदान तिकडेच ठेवा. सरकार कारण सुद्धा असं देतं की पीक विम्याचा प्रश्न हा कंपनीचा आहे. परंतु राज्य तुम्ही चालवताना ना? राज्य तुम्ही चालवता. तुमचं कंपन्यावरती नियंत्रण पाहिजे. कंपन्या ऐकत नसतील तर त्यांना उलटे टांगून हाणा. आमचे पैसे घ्यायला गोड लागतात कंपन्यांना आणि देताना त्यांना काय होतं? असा सवाल त्यांनी केला.