मनोज जरांगे पाटील यांनी लाडकी बहीण योजनेवर जोरदार टीका केली आहे. लाडकी बहीण योजना चांगली असेल तर मला माहीत नाही. पण या योजनेसाठी दिलेले पैसे हे जनतेचे आहेत. त्यांनी थोडीच घर विकून पैसे दिलेत? हे पैसे राज्यातील जनतेचे आहेत, अशी जोरदार टीका मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर केली आहे. निवडणूक जवळ आल्यावर हे लोकांना नादी लावतात. हे देतो, ते देतो म्हणून घोषणा करतात आणि गरीबांचे रक्त पितात, असा हल्लाच मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. मीडियाशी बोलताना त्यांनी हा हल्ला चढवला आहे.
तुम्ही जर प्रत्येकवेळी श्रीमंतांनाच निवडून आणलं तर ते मोठे होतील. तुमची लेकरं मोठी होणार नाहीत. गरीबांना खोटी आश्वासनं दिली जात आहेत. धनगर, मुसलमान आणि मराठ्यांना फसवलं आहे. आता हे लोकांच्या लक्षात आलं आहे. हे तात्पुरते नादी लावतात. पैसे देतात. पण हे पैसे काही आयुष्याला पुरत नाहीत. आपल्याला आयुष्यासाठी कायमच्या सुविधा हव्या आहेत, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
आम्ही महाराष्ट्रातील सर्व विधानसभा जागा लढवणार आहोत. राखीव जागा आम्ही तर पूर्ण काढणार आहोत, त्याबाबत दुमतच नाही. ज्या जागा आमच्या विचाराच्या आहेत. त्या फिक्स आहेत. आमच्या एससी एसटीच्या जागाही फिक्स आहेत. राज्यातील सर्वा जागा लढवायच्या की पाडायच्या हे अजून ठरायचे आहे. पण आमची राखीव जागांबाबतची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही छत्रपतींचे गनिमी कावे वापरू. त्यांच्या लक्षात येऊ देणार नाही. देवेंद्र फडणवीस यांचं षडयंत्र आम्ही मोडून काढणार आहोत, असं जरांगे यांनी स्पष्ट केलं.
गोरगरिबांच्या मानगुटीवर बसणारे हे लोक आता उघडे पडायला लागले आहेत. काहीही झाले तरी मराठा मात्र मागे हटणार नाही आणि मीही मागे हटणार नाही. मागे जे व्हायचे ते होऊद्या. मी काही आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटत नाही. श्रीमंत हा श्रीमंत होत चालला आहे आणि गरीब हा गरीब होत चालला आहे. मला तेच नेमके उलटे करायचे आहे. गरीब मोठा कसा होईल आता हेच बघायचे आहे. श्रीमंत का मोठा होऊ द्यायचा? आता ही दिशा बदलून टाकायची आहे, असंही त्यांनी सांगितलं.
त्यांना आमची रणनीती बघायची आहे. आमच्या भूमिकेकडे त्यांचं लक्ष लागलं आहे. आम्ही कोणत्या मतदारसंघात कोणते उमेदवार देतो याचं नियोजन बघायचं आहे. आता मराठे रेटत नाहीत. धनगर ऐकत नाहीत. आणि सामान्य ओबीसींना अनेक प्रश्न आहेत. यांचा नेरेटिव्ही भरून निघत नाही. कारण जनतेत आक्रोश आहे. म्हणून ते निवडणूक पुढे ढकलत आहेत. राष्ट्रपती त्यांचे आणि राज्यपालही त्यांचे आणि प्रशासक ही त्यांचा आहे, असा हल्ला त्यांनी चढवला.