कमी होणारी शुगर वाढलीच कशी? चौथ्याच दिवशी जरांगेंची प्रकृती बिघडली; कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल

| Updated on: Sep 20, 2024 | 3:50 PM

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे. आज मनोज जरांगे पाटील यांची तब्येत प्रचंड खालवली आहे. शरीरातील साखर कमी झाल्याने त्यांना थकवा जाणवत असून जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या वैद्यकीय पथकाने आज जरांगे यांची तपासणी केली. मनोज जरांगे यांना जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी उपचार घेण्याची विनंती केली आहे. मात्र मनोज जरांगे यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे.

कमी होणारी शुगर वाढलीच कशी? चौथ्याच दिवशी जरांगेंची प्रकृती बिघडली; कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल
Jarange Patil
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली आहे. जरांगे हे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. चार दिवसातच जरांगे यांची प्रकृती खालावली आहे. वारंवार उपोषण करत असल्यामुळे जरांगे यांच्या शरीरात त्राण राहिलं नाही. त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडल्याचं सांगितलं जात आहे. जरांगे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. मनोज जरांगे यांनी उपोषण सोडावं म्हणून अनेकांचे प्रयत्नही सुरू आहेत. मात्र, जरांगे उपोषणावर ठाम असल्याने पेच निर्माण झाला आहे.

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाला बसले आहेत. 16 सप्टेंबरच्या रात्रीपासून मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केलं होतं. आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. या चार दिवसात जरांगे यांनी पाण्याचा थेंबही घेतलेला नाही. त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली आहे. आज चौथ्या दिवशी तर त्यांची प्रकृती अधिकच बिघडली. त्यांना उपचार घेण्याबाबत आग्रह केला जात आहे. पण जरांगे यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे.

नेमका त्रास काय?

मनोज जरांगे यांना प्रचंड थकवा जाणवत आहे. त्यांना अशक्तपणा आला आहे. त्यांना गरगरल्या सारखं होत असून दोन पावलंही चालता येत नाही. चालताना त्यांना कार्यकर्त्यांचा आधार घ्यावा लागत आहे. चालत असतानाच ते मध्येच जमिनीवर बसून घेत आहेत. गुडघ्यात डोकं घालून मनोज जरांगे बराच वेळ बसून राहत आहेत. त्यामुळे त्यांच्या उपोषणस्थळी बसलेल्या कार्यकर्त्यांच्या मनात कालवाकालव होत आहे. मनोज जरांगे पाटील हे स्टेजवरून खाली उतरले, पण प्रचंड थकवा वाढल्याने त्यांनी लगेच बसून घेतलं. जरांगे यांची ही केविलवाणी अवस्था पाहून महिलांना अश्रू अनावर झाले आहेत.

गेम करू नका

माझा शुगर कमी होत होता. कमी होणारी शुगर वाढलीच कशी? असा सवाल करतानाच सरकारचं ऐकून माझा गेम करू नका, असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांचं हे सहावं उपोषण आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून त्यांचं हे उपोषण सुरू आहे.

जरांगे पाटील यांच्या मागण्या

◆ मराठा समजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी राज्यसरकारने काढलेल्या अध्यादेशाची अंमलबजावणी करावी

◆ मराठा हे कुणबीच आहेत आणि त्यामुळे हैदराबाद, सातारा आणि बॉम्बे गॅझेटचा आधार घेत मराठा समाजाला कुणबी दाखले देत आरक्षण द्यावे

◆ अंतरवलीसह महाराष्ट्रामध्ये मराठा आंदोलना दरम्यान दाखल झालेले गुन्हे परत घ्यावे