मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना-भाजपचा ज्या जागेवरुन तिढा कायम होता, त्या ईशान्य मुंबईच्या जागेवरुन अखेर भाजपचा उमेदवार ठरला आहे. भाजपचे नेते आणि मुंबई महानगरपालिकेतील भाजपचे नगरसेवक मनोज कोटक यांना ईशान्य मुंबईतून भाजपने उमेदवारी जाहीर केली. मनोज कोटक यांच्या नावावर भाजपकडून शिक्कामोर्तब झाल्याने, विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांना डच्चू मिळाला आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेवर आक्रमक टीका करणं किरीट सोमय्यांना भोवलं आहे. शिवसेनेच्या टोकाच्या विरोधामुळे सोमय्यांचा पत्ता कट झाला आहे.
BJP releases 16th list of 6 candidates in Maharashtra and Uttar Pradesh for #LokSabhaElections2019 . Manoj Kotak to contest from Mumbai North East (where Kirit Somaiya is the sitting MP), Dinesh Lal Yadav ‘Nirhua’ to contest from Azamgarh (UP) against SP’s Akhilesh Yadav. pic.twitter.com/uQvwJpGRSl
— ANI (@ANI) April 3, 2019
ईशान्य मुंबईतून किरीट सोमय्या हे भाजपचे विद्यमान खासदार आहेत. मात्र, शिवसेना-भाजप युती झाल्याने किरीट सोमय्या यांना पुन्हा खासदार होण्याच्या स्वप्नावर पाणी फेरावं लागलं आहे. कारण लोकसभेसाठी शिवसेना-भाजप युती झाली असली, तरी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजप स्वबळावर लढले होते. त्यावेळी भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेना पक्ष आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी शब्दात टीका केली होती. अगदी उद्धव ठाकरेंना ‘माफिया’ बोलण्यापर्यंत किरीट सोमय्या सरसावले होते.
अखेर किरीट सोमय्या यांना महापालिका निवडणुकीत शिवसेनेवर टीका करणं चांगलंच भोवलं आहे. ईशान्य मुंबईतून आपल्याला पुन्हा तिकीट मिळावं म्हणून किरीट सोमय्या यांनी खूप प्रयत्न केले. मात्र, ईशान्य मुंबईतील स्थानिक शिवसैनिकांनी किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीला जोरदार आक्षेप घेतला. शिवसेनेचे विक्रोळीचे आमदार सुनील राऊत यांनी तर किरीट सोमय्यांना उमेदवारी दिल्यास आपण बंडखोरी करत त्यांच्या विरोधात लढणार असल्याचाच इशारा दिला होता. त्यामुळे सोमय्यांचे धाबे दणाणले होते.
त्यानंतर नुकतेच काँग्रेसमधून आलेले नगरसेवक प्रवीण छेडा, राष्ट्रवादीतून आलेले आमदार प्रसाद लाड यांनी किरीट सोमय्यांना पुन्हा खासदारकीचं तिकीट मिळावं म्हणून ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकेर यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तो प्रयत्न हा प्रयत्नच राहिला. कारण भाजपने अखेर किरीट सोमय्यांच्या जागी मनोज कोटक यांना उमेदवारी जाहीर केली.
कोण आहेत मनोज कोटक?
• मनोज कोटक हे भाजपचे विद्यमान नगरसेवक आहेत.
• मुंबई महापालिका निवडणुकीत ते मुलुंडमधून निवडून आले आहेत
• मनोज कोटक हे महापालिकेत भाजपचे गटनेते आहेत
• मनोज कोटक यांचा मुलुंड आणि भांडूप परिसरात जनसंपर्क आहे
• ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात मराठी-अमराठी मतांचा मेळ घालण्यासाठी मनोज कोटक यांचं नाव पुढे
ईशान्य मुंबईतील लढत
दरम्यान, मनोज कोटक यांना उमेदवारी मिळाल्याने आता ईशान्य मुंबईतून मनोज कोटक विरुद्ध राष्ट्रवादीचे संजय दिना पाटील यांच्यात लढत होणार आहे.