मुंबई: शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे (vinayak mete) यांचं निधन झाल्यानंतर मराठा (maratha) समाजाकडून काही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. विनायक मेटे हे मराठा आरक्षणा संदर्भात मंत्रालयात होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी निघाले होते. ते बीडहून निघाले होते. आधी दुपारी 4 ची बैठक सांगितली गेली. नंतर ही बैठक दुपारी 12 वाजता असल्याचं सांगितलं. मेटेंनी आपण बीडमध्ये असून दुपारी 12 पर्यंत पोहोचणं शक्य नसल्याचं सांगितलं होतं. तरीही त्यांना बैठकीला यावं लागलं. ऐनवेळी या बैठकीची वेळ कुणी बदलली? बैठकीची वेळ बदलण्याचा कुणी दबाव आणला होता? या सर्वांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाने केली आहे. मीडियाशी संवाद साधताना मराठा क्रांती मोर्चाच्या (marathi kranti morcha) नेत्यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे.
मराठा क्रांती मोर्चाचे नेते दिलीप पाटील यांनी हा सवाल केला आहे. काल सकाळी बैठकीचा निरोप आला. संध्याकाळी 4 वाजता बैठक असल्याचं सांगितलं. त्यानंतर संध्याकाळी 7 वाजता निरोप आला की दुपारी 12 वाजताची बैठक आहे. या बैठकीला महाराष्ट्रातून मराठा प्रतिनिधी येणार होते. मेटे साहेब बीडमध्ये होते. एवढ्या कमी वेळात ते एवढं अंतर कसं कापू शकले असते? बैठकीचा टायमिंग बदललं कुणाच्या सांगण्यावरून करण्यात आला. कुणाच्या दबावावरून करण्यात आला. याची चौकशी व्हावी ही मागणी आहे, असं दिलीप पाटील म्हणाले.
प्रशासनाने चौकशी केली पाहिजे. कुणी तरी दबाव निर्माण केला त्यामुळेच बैठकीची वेळ बदलली. कुणी वेळ बदलली हे आम्हाला माहीत आहे. पण आम्ही नाव घेण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी त्याची चौकशी करावी. हा अपघात आहे. त्यामागे काही घातपात असेल तर चौकशी व्हावी. मेटे हे मराठा समाजाचे नेते होते. आरक्षण आंदोलन महत्त्वाच्या पॉइंटवर आलेलं असताना अपघात झाला. त्यामुळे चौकशी झाली पाहिजे, असंही ते म्हणाले. ही वेळ बदलली नसती तर मेटे सकाळी निघाले असते. कोणताही अपघात झाला नसता. कदाचित ड्रायव्हरला झोप लागली असेल तर त्यालाही बदलण्यात आलेली बैठकीची वेळच जबाबदार आहे, असंही त्यांनी सांगितलं.
शिवसेना नेते अरविंद सावंत यांनीही मेटे यांच्या अपघाती निधनावर दु:ख व्यक्त केलं. मेटेंना अचानक कुणी बैठकीला बोलावलं याची चौकशी व्हावी. हे प्रकरण गंभीर आहे. नवीन सरकार आलं तेव्हा मेटेंची काहीच प्रतिक्रिया आली नव्हती. चांगली वाईट काहीच प्रतिक्रिया त्यांनी दिली नाही. हे प्रकरण गंभीर वाटतं. त्यामुळे त्याची चौकशी व्हावी. गंभीरपणे चौकशी व्हावी. कुणी त्यांना रात्री बोलावलं याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी अरविंद सावंत यांनी केली.
>> विनायक मेटे यांना एक तास मदत का मिळाली नाही?
>> अपघाताची पोलिसांना माहिती का मिळाली नाही?
>> अपघात झाल्यानंतर महामार्गावर तातडीने मदत देण्याचे प्रोटोकाल काय आहेत?
>> महामार्गावर तातडीने मदत का मिळत नाही?
>> महामार्गावर सुविधा देत नाही तर मग भरमसाठ टोल का घेता?
>> महामार्गावर उपचारासंबंधी किमान दर्जाची व्यवस्था का मिळत नाही?
>> लेनची शिस्त न पाळणाऱ्या अवजड वाहनांना शिस्त कशी घालणार?