जालना | 1 डिसेंबर 2023 : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची जालन्यात आज जाहीर सभा झाली. यावेळी जरांगे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर सडकून टीका केली. “सगळ्यांच्या टॉच चालू करा. एकही टॉर्च बंद ठेवू नका. आता ते काही झोपत नाही गड्या. हिंगोलीत येऊन गप्पा हाणतो. इकडे येतो आणि जातीवाद करतो. घटनेच्या पदावर बसतो, सरकारसोबत राहतो, आणि महापुरुषांच्या जाती काढणारा, भारतातला सर्वात कलंक लागलेला मंत्री म्हणजे छगन भुजबळ. जाती-जातीत तेढ निर्माण करणारा, ओबीसी बांधव आणि मराठा बांधव गुण्यागोविंदाने जगत असताना त्यांच्यामध्ये दंगली घडवण्याचं काम करणारा, सगळ्यात वाया गेलेला मंत्री म्हणजे छगन भुजबळ”, असा घणाघात मनोज जरांगे पाटील यांनी केला.
“स्वत:चं वय झालेलं असताना, कायद्याच्या पदावर बसलेला असताना, कायदा पायदडी तुडवणारा, इतक्या खालच्या दर्जाचा माणूस आतापर्यंत कधी झाला नाही. या भारत देशात आणि महाराष्ट्रात महापुरुषांच्या जाती काढणारा आतापर्यंत एकही व्यक्ती झाला नाही. यांनी महापुरुषांच्या जाती काढल्या, राजद्रोह सारखा प्रकार हा माणूस करायला लागला आहे. जाती-जातीत दंगली भडकवण्याचा प्रकार करायला लागला आहे”, असा आरोप मनोज जरांगेंनी केला.
“मराठा ओबीसी आरक्षणामध्ये आहे. तरीही मराठ्यांना ओबीसी आरक्षण न देण्याचा चंग या माणासाने बांधला. मराठा ओबीसी आरक्षणात असताना 70 वर्षांपासून याच्या दबावाखाली सरकार आलं आणि असणाऱ्या नोंदी, मराठ्यांना असणारं आरक्षण या एकट्याने मिळू दिलं नाही”, असा दावा मनोज जरांगेंनी केला. “तुम्ही 24 डिसेंबरला छगन भुजबळ यांचं ऐकून दगाफटका केला तर आंदोलन शांततेत असणार पण ते किती डेंजर असणार मग तुम्हाला त्या वेळी समजेल”, असा इशारा मनोज जरांगेंनी दिला.
“भारतात आतापर्यंत महापुरुषांच्या कुणी जाती काढल्या काय? आपण अरेतुरे कुणाला म्हणतो, आपल्यापेक्षा लहान वयाच्या माणसाला, आणि उंचीचा असला तर त्याला अहो-जाहो म्हणतो. सरकार याला त्यांच्यासोबत हिंडूच कसं देतंय? म्हणजे सरकारनेच त्यांना सांगितलं की, तू जाती काढत जा, तुला काही अडचण नाही, आमचा तुला पाठिंबा आहे, तू जातीवाद निर्माण कर, जातीय तेढ निर्माण कर, असं सरकारने सांगितलं का?”, असा सवाल मनोज जरांगेंनी केला.
“सरकारला एक शेवटची विनंती आहे, 2 तारखेला उद्या एक महिना पूर्ण होतोय. दोन दिवसांत अंतरवलीतले गुन्हा आणि एक महिन्यात महाराष्ट्रातील मागे घ्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावतीने तीन लोकं आले. मंत्री उदय सामंत, धनंजय मुडे, संदीपान भुमरे, अतुल सावे आले होते. यांनी सांगितलं की, गुन्हे मागे घेतले जातील, एकालाही अटक केली जाणार नाही. मग अंतरवलीतील कार्यकर्त्यांना का अटक केली?”, असा सवाल मनोज जरांगेंनी केला.
“तुम्ही आम्हाला खेटू नका, खोटं बोलून आमच्याशी गद्दारी करु नका. तुम्ही जाहीरपणाने सांगितलं होतं गुन्हे मागे घेतले जातील, कुणालाही अटक केली जाणार नाही. तुम्ही आमच्या लोकांना अटक का केली? त्याचं एकट्याच ऐकून, तो हिंगोलीला बोलला एमसीआर दिला म्हणून पीसीआर दिला का? तुम्ही पुन्हा डाव रचू नका”, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.