चंदन पूजाधिकारी, टीव्ही 9 मराठी, नाशिक : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण चांगलंच तापल्याची चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेणार असल्याची माहिती मिळतेय. दुसरीकडे भाजप नेत्यांनीही आक्रमक भूमिका घेत मराठा संघटनांच्या पाठिशी आपली ताकद उभी केली आहे. अशावेळी भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सर्व मराठा संघटनांना एकत्र येण्याचं आवाहन केलंय. संभाजीराजे छत्रपती आणि विनायक मेटे यांनाही एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती विखे-पाटील यांनी आज लोणी इथं माध्यमांशी बोलताना दिली. (Radhakrishna Vikhe-Patil’s appeal to MP Sambhaji Raje Chhatrapati)
मराठा समाजाच्या भावना जाणून घेण्यासाठी आपण बैठका घेत असल्याचं विखे-पाटील यांनी सांगितलं. या बैठकांमध्ये मराठा आंदोलनाच्या भविष्यातील रणनितीबाबत चर्चा करण्यात येत आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर लोकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. सगळ्या संघटनांच्या नेत्यांनी एकत्र यावं असं आवाहन आपण करत असल्याचं विखे-पाटील म्हणाले. खासदार संभाजीराजे आणि विनायक मेटे यांनाही एकत्र आणणार असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात 23 संघटना काम करत आहेत, मग भूमिका वेगळी का? असा सवालही विखे-पाटील यांनी उपस्थित केलाय.
राज्य सरकार समाजात फूट पाडून स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करत आहे. आपण आज किंवा उद्या संभाजीराजे यांच्याशी चर्चा करणार आहोत. आपली भूमिका ही समन्वयाची आहे. संभाजीराजे यांना आंदोलन पुढे ढकलण्याची विनंती आपण करु. सगळे एकत्र येऊन आठवड्याभरात बैठक घेऊ. कोणत्याही आंदोलनाचं नेतृत्व सामुदायिक असावं, असं विखे पाटील यावेळी म्हणाले. संभाजीराजे यांनी राज्यातील संघटनांच्या बैठकीला यावं, अशी विनंती आपण त्यांना करणार आहोत. समाजाचा दबाव वाढला की नेते मंडळी पुढे येतील, असा दावाही विखेंनी यावेळी केलाय.
खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा असल्याचं मराठा क्रांती मोर्चाचे करण गायकर यांनी सांगितलं आहे. मराठा आरक्षणासंदर्भातील पुढील लढ्यासंदर्भात करण गायकर यांनी त्यांची भूमिका जाहीर केली. करण गायरकर यांनी 16 जूनला वेगवेगळ्या तालुक्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलन करण्यात येईल, असं देखील सांगितलं आहे.सकल मराठा क्रांती मोर्चाचं आंदोलन ठरलेलं आहे. राजकीय नेत्यांनी याला राजकीय वळण देऊ नये. हे अराजकीय व्यासपीठ आहे, ते तसेच ठेवा, असं मराठा क्रांती मोर्चाच्या प्रतिनिधींकडून यावेळी सांगण्यात आलं आहे.
सकल मराठा क्रांती मोर्चाचं आंदोलन ठरलेलं आहे. राजकीय नेत्यांनी याला राजकीय वळण देऊ नये. हे अराजकीय व्यासपीठ आहे, ते तसेच ठेवा. यापुढे जर संभाजीराजे छत्रपती यांच्यावर वैयक्तिक टीका केली तर समाचार घेण्यात येईल, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं नाशिक येथे देण्यात आला. आम्ही कोणाला आंदोलनासाठी कोणाला थांबवलेलं नाही, असंही सांगण्यात आलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंगळवारी पंतप्रधानांना भेटणार; मराठा आरक्षणावर होणार चर्चाhttps://t.co/KdULgLUXfc#NarendraModi | #cmuddhavthackeray | #MarathaReservation | #marathaquota
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 7, 2021
संबंधित बातम्या :
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंगळवारी पंतप्रधानांना भेटणार; मराठा आरक्षणावर होणार चर्चा
अशोक चव्हाणांचा राजीनामा मराठा समाज मागेल, भाजप मागणार नाही: चंद्रकांत पाटील
Radhakrishna Vikhe-Patil’s appeal to MP Sambhaji Raje Chhatrapati