उपरा म्हणून आला, उपरा म्हणून मेला, त्याला भारताचा हिटलर नाही आले होता, रझाकार संघटनेचा पळपुटा कासिम रिजवी कोण होता? मुहाजिरचा कसा बसला शिक्का?

| Updated on: Sep 18, 2024 | 4:08 PM

Marathwada Mukti Sangram Din : मराठवाड्यात आजही अन्यायाला रझाकार हा पर्यायी शब्द वापरतात. कासिम रिजवी, हैदराबादचा क्रूरकर्मा. त्याच्या आदेशावरून जनतेवर अन्वनित अत्याचार करण्यात आला. त्याला भारताच्या पोटात एक धर्मांध देश तयार करायचा होता. त्याचे भारताचा हिटलर व्हायचे स्वप्न अवघ्या दोनच वर्षांत चकनाचूर झाले. रझाकार संघटनेच्या कासिम रिजवीचं पुढं झालं काय?

उपरा म्हणून आला, उपरा म्हणून मेला, त्याला भारताचा हिटलर नाही आले होता, रझाकार संघटनेचा पळपुटा कासिम रिजवी कोण होता? मुहाजिरचा कसा बसला शिक्का?
कासिम रिजवी कोण होता?
Follow us on

भारत स्वतंत्र झाल्यानंतर 13 महिने मराठवाड्यासह हैदराबादमधील अनेक भागांना पारतंत्र्याविरोधात, अत्याचाराविरोधात संघर्ष करावा लागला. स्वतंत्र भारताच्या मध्यभागी असलेल्या या लोकांचा अमानुष छळ झाला. स्त्रीयांवर अत्याचार झाले. अनेकांना जीवंत जाळण्यात आले. लुटालुटीची तर मोजदाद नाही. रझाकारांनी त्यावेळी या संस्थानात नंगानाच केला. त्याला निजाम, पाकिस्तान आणि इंग्रजांची फूस होती. भारतात अजून एक धर्मांध राष्ट्र तयार करण्याची पाकिस्तानची रणनीती होती. मराठवाड्यातील जनतेने, स्वामी रामानंद तीर्थ, अनेक लढवय्ये नेते आणि सरदार वल्लभभाई पटेल यांनी हा प्रयत्न हाणून पाडला. हैदराबाद संस्थान 17 सप्टेंबर 1948 रोजी भारतात विलीन झाले. 224 वर्षांचे जुने हैदराबाद संस्थान अवघ्या 109 तासांत गुडघ्यावर आलं. दिल्लीवर झेंडा फडकविण्याचा स्वप्न पाहणारा रझाकारांचा नेता कासिम रिजवीचं पार पानीपत झालं. त्याचं भारताचा हिटलर व्हायचं स्वप्न धुळीस मिळालं. मग या रिजवीचं पुढे झाले काय? तो कुठे गेला? त्याच्यावर मुहाजिरचा शिक्का कसा बसला?

कासिम रिजवी हा उपरा

कासिम रिजवी हा लातूरचा असा समज आज पण आहे. त्याच्याविषयी बरेच संभ्रम आहे. तो मुळचा लातूरच नव्हता तर तो उत्तर प्रदेशमधील लखनऊ येथील होता, अशी पण एक माहिती समोर आली आहे. सय्यद मोहम्मद कासिम रिजवी असे त्याचे पूर्ण नाव आहे. त्याचा जन्म 17 जुलै 1902 लखनऊ येथ झाला. त्याने अलिगड मुस्लिम विद्यापाठातून कायद्याची पदवी मिळवली. त्यावेळी हैदराबाद संस्थानमध्ये इतर राज्यातील मुस्लीमांना वसविण्याचे आणि बहुसंख्य हिंदूंना अल्पसंख्यांक करण्याचा निजामाचा डाव सुरू होता. त्यात रिजवी पण हैदराबाद येथे आला. त्याने येथेच वकिलीचा व्यवसाय थाटला. काही दिवस मोहम्मद अली फजल यांच्याकडे त्याने शिकाऊ उमेदवारी केली. त्याची हैदराबाद येथील बड्या लोकांसोबत ओळख झाली.

हे सुद्धा वाचा

लातूरचा त्यावेळचा पोलीस उपअधिक्षक अब्दुल है (Abdul Hai) यांच्याशी त्याची ओळख झाली. त्यांच्या मुलीशी याचा निकाह झाला. त्यांनी कासिमला लातूर येथे आणले. त्यावेळी लातूर येथे तालुका कोर्ट होते. तिथे त्याने वकिली सुरु केली. लातूरमधील गोलाईगंजच्या समोर हाकेच्या अंतरावर त्याचे घर होते. त्याचे लातूरमध्ये बस्तान बसले. अनेक केसेसमध्ये त्याला यश मिळाले. हिंदूच्या केस सुद्धा त्याने लढल्या. तोपर्यंत त्याच्यावर कट्टर धार्मिक विचारांचा पगडा नव्हता. पण एका घटनेने त्याचा धर्मांधाकडे प्रवास सुरू झाला.

पाकिस्तानचा जनक बॅरिस्टर मोहम्मद अली जिना असले तरी पाकिस्तानची मूळ संकल्पना नवाब बहादुर यार जंग याने रूजवले. जिना आणि आलमा इकबाल हे दोघे या नवाबला मानत होते. तर नवाब बहादुर यार जंग याने मजलिस-ई-इत्तेहादूल मुसलमीन म्हणजे एमआयएम या संघटनेचे नेतृत्व 1927 साली केले. एमआयएम संघटना ही उस्मानिया विद्यापीठातील दोन प्राध्यापकांनी सुरु केली होती. जंग हा निजामाच्या लष्करातील एक शिपाई होता. जगात मुस्लीम हे राज्यकर्ते आहेत, ही त्याची संकल्पना होती. जिना या संकल्पनेने प्रभावित झाले होते. पुढे जंग यानेच 1940 साली रझाकार ही आणखी संघटना पुढे आणली. रझाकार या शब्दाचा अर्थ स्वयंसेवक असा होता. सालार म्हणजे गावातील शाखेपासून या संघटनेची बांधणी सुरू झाली. जंग एका कार्यक्रमानिमित्त लातूरला आले. त्यावेळी कासिम रिजवी त्यांच्या संपर्कात आला. तो जंग यांच्या व्यक्तिमत्वाने एकदम प्रभावित झाला. त्याने त्याचे लातूरमधील राहते घर एमआयएम आणि रझाकार संघटनेसाठी दान केले. रझाकार संघटनेतील काही गुंडांनी हिंदू आणि मुसलमान यांच्यावर दादागिरी सुरू केली. त्यात एका ठिकाणी या गावगुंडांनी धुमाकूळ घातला. त्यांना पोलिसांनी पकडून नेले. त्यावेळी रझाकारांनी पोलीस ठाण्यावर हल्ला चढवला. पोलिसांनी गोळीबार केला. या सर्व प्रकरणात कासिम रिजवी सक्रिय असल्याचे समोर आले.

कासिम रिजवीने त्याचे बस्तान लातूरहून हैदराबादला हलवले. त्याकाळात रझाकार ही अधिक कडवी आणि कट्टर धार्मिक संघटना झाली होती. हिंदूवर अत्याचार करण्यासाठी तिचा वापर करण्यावर भर देण्यात येत होता. गावोगावी तिच्या शाखा स्थापन करण्यात येत होत्या. निजामाने एमआयएमवर बंदीचे नाटक केले. पण रझाकारांना मोकळीक दिली होती. रझाकार हे जणू हैदराबाद स्टेट फोर्स या निजमाच्या लष्कराचे अर्धसैनिकच झाले होते. त्याचवेळी हा बहादुर जंग अवघ्या 39 व्या वर्षी 1944 रोजी मरण पावला. त्यानंतर मीर उस्मान अली याची एमआयएम आणि रझाकार संघटनेचा प्रमुख म्हणून नियुक्ती झाली. पण त्याला या दोन्ही संघटना काही हाताळता आल्या नाही. 1946 मध्ये त्याला मागे खेचत कासिम रिजवीने सर्व सूत्र हाती घेतली. गुलबर्गा येथील अधिवेशनात पक्षाची सत्ता सूत्र त्याच्या हातात आली.

रझाकारांचा अत्याचार

कासिम रिजवीने रझाकार संघटनेची सूत्र हाती घेताच, गावोगावी मोठ्या प्रमाणात स्वयंसेवक भरती सुरू केली. त्याने निजामावर दबाव टाकत त्यांच्यासाठी निधीची व्यवस्था केली. लष्करी प्रशिक्षण सुरू केले. भारताला स्वातंत्र्य मिळणार असल्याचे लक्षात येताच त्याने विविध देशांकडून शस्त्र साठा वाढवायला सुरूवात केली. ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, युरोप येथून लपून-छपून शस्त्रे हैदराबादला आणण्यात येऊ लागली. त्यातच गोवा पोर्तुगालकडून खरेदी करण्याच्या हालचाली निजामाने सुरू केल्या. कासिम रिजवी आणि इतर सल्लागारांनी हा सल्ला निजामाला दिला होता. निजामाकडे स्वतःचे 42 हजारांचे सैन्य होते. त्यात 25, हजार रोहिल्यांचं भाडोत्री सैन्य होतं. तर रझाकारांची संख्या 3 ते 5 लाखांदरम्यान होती. त्यातील अनेकांना लष्करी प्रशिक्षण देण्यात आलं होते.

हिटलर होण्याचे स्वप्न

हिटलर आणि मुसोलिनीने वांशिक भेदाने अत्याचार केले. शुद्ध वंशाच्या नावाखाली हत्याकांड घडवून आणले. कासिम रिजवीला भारतात दुसरा पाकिस्तान तयार करायचा नव्हता. तर संपूर्ण भारतावर निजामाचं राज्य आणायचं होतं. निजामाचा असफिया झेंडा दिल्लीच्या लाल किल्ल्यावर फडकवायचा आहे, त्यासाठी जिहाद करण्याचे तो जाहीर सभेत सांगत होता. आपण भारतीय सैन्याचा सहज पाडव करु अशा वल्गना तो करत होता. हिटलर आणि मुसोलिनीने जसा त्याच्या स्वयंसेवकांसाठी लष्करी गणवेश तयार केला होता. त्याच धरतीवर रझाकारांना खाकी सदरा, विजार असा लष्करी पोशाख होता. ही संघटना गोरगरीब हिंदूवर अत्याचार करत होती. या काळात धर्मांतराचे प्रकार घडले. लढाईला तोंड फुटले तर पाकिस्तान आपल्या मदतीला सहज येईल, असा कासिम रिजवीला विश्वास होता. त्याच दरम्यान जिना यांचा मृत्यू झाला आणि भारताने हैदराबादवर पोलीस ॲक्शन केली. अवघ्या 109 तासात निजामाचा पराभव झाला. या लष्करी कारवाईला ‘ऑपरेशन पोलो’ असे नाव देण्यात आले. अवघ्या पाचच दिवसात निझामाचा पाडाव झाला. या कारवाईत 1,373 रझाकार मारल्या गेले. निझामाचे 807 जवान ठार झाले. तर भारताचे 66 जवान शहीद झाले. रझाकारांनी कुठेच मोठा प्रतिकार केल्याचे समोर आले नाही.

ऑपरेशन पोलो दरम्यान पळपुटा रिजवी होता कुठे?

निजामने भारतात विलिनीकरणाच्या करारावर स्वाक्षरी केली. कफल्लक माणसाच्या नादी लागून आपण सर्वच गमावले अशी सडकून टीका त्याने कासिम रिजवीवर केली. त्याच्यामुळे आपली प्रतिष्ठा धुळीस मिळाली असे निजाम म्हणाला. पोलीस कारवाई झाली त्यावेळी कासिम रिजवी कुठं होता, असा अनेकांच्या मनात प्रश्न येतो. भारतात पाकिस्तान तयार करण्याचा वल्गना करणारा कासिम रिजवी हा क्रमांक एकचा भित्रा, भेटरट आणि पळपुटा होता. आपले रझाकार भारतीय सैन्याला अवघ्या काही तासात संपवतील अशा वल्गना त्याने केलेल्या होत्या. पण प्रत्यक्षात ज्यावेळी भारतीय सैन्याने सर्व बाजूने हैदराबाद संस्थानला घेरलं. त्यावेळी रिजवी हैदराबादमध्ये नव्हता की युद्धाच्या आघाडीवर नव्हता. तर गोवळकोंड्याला पळाला होता. त्याचा मेव्हणा तिथे होता. त्याच्या घरी तो लपून बसला होता. अधिकारी ज्यावेळी त्याला अटक करायला गेले. त्यावेळी रिवॉल्वर डोक्याला लावून तो उभा होता. मला अटक करण्याचा प्रयत्न केला तर मी आत्महत्या करेल असा तो ओरडत होता. 23 सप्टेंबर 1948 ला त्याला अटक करण्यात आली. त्याच्याविरोधात तीन खटले चालविण्यात आले.

कासिम रिजवीला मारले का नाही?

कासिम रिजवीने हिंदूवर इतके अत्याचार केले होते की त्याला सीमा नाही. स्त्रीयांवर अत्याचार, लोकांना जीवंत जाळणे, लुटपाट करण्यात आली होती. भारताविरोधात युद्ध पुकारले होते. तरीही त्याला गोळ्या का झाडल्या नाही. त्याला फाशी का दिले नाही? असा सवाल आजही विचारण्यात येतो. त्यावेळच्या भारतीय नेतृत्वाला कासिम रिजवी हा कफल्लकच नाही तर कुटाळ असल्याचे लक्षात आले होते. त्यामुळे त्याला मारुन शहीद करण्याची मानसिकता उभी ठाकू नये यासाठी त्याला मारण्यात आले नाही. रिजवीविरोधात तीन खटले चालविण्यात आले. त्यात पत्रकार शोएब मुल्ला खान यांची आणि त्यांच्या नातेवाईकच्या खूनाचा खटला महत्वाचा ठरला. शोएब खान हे हैदराबाद संस्थान भारतात विलीनि‍करणाच्या बाजूने सातत्याने अग्रलेख लिहित होते. हिंदूवरील अत्याचाराच्या बातम्या देत होते. रिजवीच्या आदेशाने त्यांची हत्या करण्यात आली होती. इतर दोन खटले त्याच्याविरोधात चालविण्यात आले. वकील असल्याने स्वतःची केस तो स्वतः लढला. इतर खटल्यात तो सुटला. पण बिवीनगर दरोड्यांमध्ये त्याला सात वर्षाची शिक्षा झाली. चंचगुडा तुरुंगात त्याची रवानगी झाली. पण येथे आपल्याला लोक त्रास देत आहेत. कैदी आपल्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशा तक्रारी त्याने सुरू केल्या. या तुरुंगात आपला खून होईल अशी भीती त्याला सतावत होती.

सात वर्षांच्या शिक्षेनंतर तुरुंगाबाहेर

तक्रारीनंतर त्याला पुण्यातील येरवडा तुरुंगात ठेवण्यात आले. सात वर्षांच्या शिक्षेनंतर 11 सप्टेंबर 1957 रोजी तो तुरुंगाबाहेर आला. तेव्हा आपल्याला घ्यायला आता लाखोंच्या संख्येने लोक येतील, रझाकार आपल्या स्वागतासाठी येतील असे त्याला वाटत होते. पण असे काही घडले नाही. त्याचा एक मित्र तेवढा त्याला घ्यायला तुरुंगाबाहेर उभा होता. कासिमने आजूबाजूला पाहिले. पण कोणी दिसले नाही. त्याने आपल्याला घ्यायला कोण कोण आले याची विचारणा केली. हारतुरे कुठे आहेत याची विचारणा केली. मित्रासह तो हैदराबाद आला. त्याने एमआयएमची बैठक बोलावली. मुख्य 140 सदस्यांना बोलावनं पाठवलं. त्यातील 40 जण बैठकीला आले. पण कोणालाच त्याच्यावर विश्वास वाटेना. कासिम रिजवीला आता आपलं इथं काही खरं नाही, हे लक्षात आलं. वाहेद ओवेसी म्हणजे आताच्या ओवेसी बंधूच्या वडिलांकडे पक्षाची सूत्र सोपवली. त्यानं अगोदरच ठरवल्याप्रमाणे पाकिस्तानला जाण्यासाठी गाठोड बांधलं. 18 सप्टेंबर 1957 रोजी मुंबई आणि तिथून त्याने पाकिस्तानला पळ काढला.

रिजवी पाकिस्तानचा मुहाजिर

2 ते 5 लाख अर्धसैनिकांचा प्रमुख असलेल्या कासिम रिजवीला भारतातील त्याचे भविष्य कळून चुकले. त्याने पोलीस कारवाईपूर्वीच त्याच्या कुटुंबियांना कराचीत पाठवले होते. हैदराबाद संस्थानला जो शस्रे पुरवित होता. त्याच्याच विमानातून त्याने कुटुंबियांना कराचीत पाठवले होते. भारतात पुन्हा स्थिर स्थावर झाले की तो त्यांना बोलावून घेणार होता. पण भारतात लोकशाही आली. बऱ्याच गोष्टी बदलल्या. त्यामुळे रिजवी पाकिस्तानला पळून गेला. आता पाकिस्तानमध्ये आपली बडदास्त ठेवण्यात येईल, अशी फुशारकी त्याने जाता जाता मारली. पण कराचीत त्याला कोणीही विचारलं नाही. पाकिस्तान सरकारकडे त्याने अनेकदा खास चर्चेची मागणी केली. पण भारतातून पाकिस्तानात गेलेल्या मुस्लिमांना जी हीन वागणूक देण्यात येते, तीच त्याच्या पदरी पडली. तो पाकिस्तानात मुहाजिर झाला. भारतातून जे मुस्लीम पाकिस्तानात धर्माच्या वेडापायी गेले. तिथल्या मुस्लिमांनी त्यांना स्वीकारलं नाही. उलटं हे आपल्यावर ओझे म्हणून आल्याने त्यांना मुहाजिर म्हटल्या जाऊ लागले. त्यात कासिमची भर पडली.

हैदराबाद येथे पाकिस्तान तयार करण्याचे मनसुबे रिजवीने आखले होते. दिल्लीवर निजामाचा झेंडा फडकवायचा असा त्याचा कट होता. पण काळाने महिमा दाखवलाच. कराची येथे तो स्थायिक झाला. हैदराबाद येथून जे मुस्लीम पाकिस्तानात पळाले. कराचीत हैदराबाद आणि बहादुराबाद असे दोन भागात ही लोकसंख्या स्थायिक झाली. बहादुर जंग याची आठवण म्हणून या परिसराला ते नाव देण्यात आले. याच ठिकाणी भारतातील चारमिनारची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. निजामने रिजवीला कफल्लक म्हटले होते, ते चुकीचे नव्हते हे पाकिस्तान सरकारने पुढे खरं करुन दाखवले. कधीकाळी भारताचा हिटलर होण्याचे स्वप्न उराशी बाळगणारा रिजवी पाकिस्तानात अगदीच सामान्य जीवन जगला. तिथल्या निर्वासीत मुसलमानांच्या हक्कासाठी ना त्याने एल्गार केला ना आंदोलन केले. निमुटपणे शरणागतांसारखं जीवन व्यतीत केलं.

तर या निर्वासीत मुसलमानांच्या केसेस कासिम रिजवी तिथल्या कोर्टात लढवू लागला. त्याला पाकिस्तान सरकारने ना कोणती पदवी दिली ना काही मदत केली. त्याची अवस्था ना घर का ना घाट का अशी झाली. ज्या पाकिस्तानच्या नादाला लागून त्याने बंडाळी केली, त्यांनी त्याला मुहाजिर म्हणूनच वागणूक दिली. 15 जानेवारी 1970 रोजी हा क्रूरकर्मा मेला. हैदराबादमध्ये आलेला हा उपरा पाकिस्तानात उपरा म्हणूनच मेला. त्याला दहा अपत्य होती. त्यात पाच मुलं आणि पाच मुली होत्या. पुढे त्यांना चांगले दिवस आले. त्याची एक मुलगी खासदार झाली. तर इतर जण पाकिस्तान चित्रपट सृष्टीत आणि राजकारणात स्थिरावले.