सध्या सगळ्या राज्यामध्ये मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख निर्घृण हत्या प्रकरणाचा विषय गाजत आहे. बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील हे प्रकरण आहे. या प्रकरणात राजकीय नेत्यांची नाव आली आहेत. आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. आज विधानसभेत शरद पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी हा विषय मांडला. “6 तारखेला विंड मिलमध्ये भांडणं झाली. हा सगळा प्रकार विंड मिलच्या रॅकेटमुळे सुरु झाला. 6 तारखेला भांडणं झाली. ती भांडणं झाल्यानंतर संतोष देशमुख तिकडचा वॉचमन आणि विंड मिलचा अधिकारी शिंदे म्हणून पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यासाठी गेले. तिथे पोलीस स्टेशनमध्ये नोंद व्यवस्थित घेतली नाही. साधी एनसी दाखल केली” असं संदीप क्षीरसागर सभागृहात म्हणाले.
“त्या प्रकरणाचे व्हिडिओ व्हायरल झालेत. 6 तारखेला कारवाई केली नाही, म्हणून 9 तारखेला संतोष देशमुख यांची हत्या झाली. सगळ्यात महत्त्वाच जेव्हा संतोष देशमुख यांना दोन गाड्या अडवून उचललं. उचलून त्यांना घेऊन गेले. त्यांचा सहतकारी सोबत होता. तो पोलीस स्टेशनमध्ये जाऊन वारंवार सांगत होता. सरपंचाना घेऊन गेलेत, त्यांच्या जीवाला धोका आहे. पण पोलिसांनी कारवाई केली नाही. दोन तीन तासानंतर त्यांची हत्या झाली” असं संदीप क्षीरसागर म्हणाले.
मोबाइल तपासा सगळं गणित समजेल
“याच्यामध्ये मला राजकारण आणायचं नाही. गुन्हेगार कोणीही असला, तरी त्या प्रवृत्तीविरुद्ध मी बोलत आहे. हे कनेक्शन आहे, पहिला आमदार म्हणून तिथे गेलो. नावासहित त्या गावातले लोक मला सांगत होते. त्या लोकांच्या सांगण्याप्रमाणे मी नावं घेतली. त्या माणसाचं नाव वाल्मिक कराड आहे. त्याचे मोबाइल रेकॉर्ड बघितले तर पूर्ण गणित हे आपल्या लक्षात येईल” असा दावा आमदार संदीप क्षीरसागर यांनी केला.
307 चा गुन्हा हा चॉकेलट खाल्ल्यासारखा दाखल होतो
“एकतर गुन्हा खरा असताना लवकर तक्रार दाखल करत नाहीत. या गुन्ह्यात 12 तास उशीर झाला. लोक आंदोलनाला बसले, तेव्हा गुन्हा दाखल झाला. दुसरीकडे खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. 307 चा गुन्हा हा चॉकेलट खाल्ल्यासारखा दाखल होतोय” असं संदीप क्षीरसागर म्हणाले.