केंद्रात सलग तिसऱ्यांदा भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच सरकार सत्तेवर आलं आहे. नरेंद्र मोदी यांनी काल तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीतील शपथविधी सोहळ्याला प्रचंड गर्दी झाली होती. शुक्रवारी नरेंद्र मोदी यांची NDA च्या संसदीय नेतेपदी निवड झाली. यावेळी NDA मधील सर्व घटक पक्षांचा योग्य तो सन्मान करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आधी अन्य पक्षांच्या प्रमुखांनी भाषणे झाली. मोदी सरकार 3.0 मध्ये एकूण 72 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी भाजपाला स्वबळावर पूर्ण बहुमत मिळालेलं नाही. त्यामुळे NDA मधील घटक पक्षांना त्यांना सत्तेतील मोठा वाटा द्यावा लागणार आहे. याआधी दोन टर्ममध्ये भाजपाने एनडीएतील घटक पक्षांची फक्त एका मंत्रिपदावर बोळवण केली होती. कारण त्यांच्याकडे पूर्ण बहुमत होतं.
पण आता अशी स्थिती नाहीय. भाजपाने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत 400 पारचा नारा दिला होता. प्रत्यक्षात त्यांचे 240 खासदार निवडून आले. बहुमतासाठी 272 आकडा लागतो. भाजपाकडे 32 खासदार कमी आहेत. आंध्र प्रदेशातील चंद्राबाबू नायडू यांचा टीडीपी आणि नितीश कुमार यांच्या जेडीयूवर मोदी 3.0 सरकारची सर्व भिस्त आहे. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातही घटक पक्षांमध्ये मंत्रिपदावरुन नाराजी कायम असल्याच चित्र आहे. सात खासदार असलेल्या शिवसेना एकनाथ शिंदे गटातील खासदाराने मनातील नाराजी बोलून दाखवली.
शिवसेना खासदाराने काय म्हटलय?
NDA च सरकार स्थापन होऊन 24 तास उलटत नाहीत, तोच शिंदे गटातील खासदाराने मनातील खदखद बोलून दाखवलीय. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला केंद्रीय राज्य मंत्री पद देऊन, दुजाभाव करण्यात आला. आमच्या शिवसेनेचा स्ट्राईक रेट पाहता, आम्हाला कॅबिनेट मंत्री पद द्यायला हवं होतं” असं म्हणत शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणेंनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. “एनडीए मधील इतर घटक पक्षांचे एक-एक खासदार निवडून आलेत, मात्र त्यांना कॅबिनेट मंत्री पद दिलं गेलं. मग शिंदे गटाबाबत भाजपने हा दुजाभाव का केला? असं होतं तर मग कुटुंबाविरोधात जाऊन महायुतीत आलेल्या अजित पवारांना ही एक मंत्री पद द्यायला हवं होतं. तसेच भाजपने साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसलेंना ही मंत्री पद द्यायला हवं होतं” असं म्हणत बारणेंनी सगळी खदखद बोलून दाखवली.