एका महिलेले तडीपार केले, त्यांच्या तोंडात लाडकी बहीण शब्द शोभतील?; शरद पवार गटाच्या नेत्याचा कुणावर हल्लाबोल?

| Updated on: Sep 27, 2024 | 8:33 PM

शिर्डीतील सरकारच्या कार्यक्रमासाठी आज एसटीचा वापर केला. स्वतःच्या प्रचारासाठी लाडक्या बहिणींना देखील वेठीस धरलं. अनेक विद्यार्थ्यांना एसटीच मिळाली नाही, असा हल्ला आमदार प्राजक्त तनपुरे यांनी चढवला आहे. राहुरीत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

एका महिलेले तडीपार केले, त्यांच्या तोंडात लाडकी बहीण शब्द शोभतील?; शरद पवार गटाच्या नेत्याचा कुणावर हल्लाबोल?
ladki bahin yojana
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

शरद पवार गटाचे नेते मेहबूब शेख यांनी भाजपचे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. प्राजक्त तनपुरे यांनी सहावी नापास माणसाला सहाव्यांदा निवडणुकीत पराभूत केले आहे. आता समोर कोणीही येऊ द्या, प्राजक्तदादा एकटाच बस. मामाचे (जयंत पाटील) गुण भाच्यात आलेले आहेत, असं सांगतानाच कर्डिले यांच्या तोंडात लाडकी बहीण हे शब्द शोभतील का? त्यांनी तर एका महिलेला तडीपार केले होते, असा घणाघाती हल्लाच मेहबूब शेख यांनी चढवला आहे. नगरच्या राहुरीत शरद पवार गटाची मोठी सभा झाली. यावेळी मेहबूब शेख यांनी शिवाजीराव कर्डिले यांच्यापासून ते अजित पवारांपर्यंत घणाघाती हहल्ला चढवला.

मेहबूब शेख यांनी यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही जोरदार टीका केली. दादा सध्या लाडकी बहीण म्हणून मिरवत आहेत. दादा तुम्ही स्वत:च्या बहिणीचे झाला नाहीत. महाराष्ट्राच्या बहिणीचे काय होणार? 71 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांनी कोणावर केला होता? आता अजित पवार कुठे आहेत? महाराष्ट्र सदन घोटाळ्यात कुणाला जेलमध्ये ठेवलं? ते छगन भुजबळ कुठे आहेत? प्रफुल्ल पटेल कुठे आहेत?, असे सवालच मेहबूब शेख यांनी उपस्थित केले.

दीड फुटाचा आमदार ठेवलाय

यावेळी त्यांनी आमदार नितेश राणे यांनाही चांगलंच फटकारलं. भाजपने दीड फुटाचा आमदार ठेवला आहे. फडणवीस मराठ्यांना आरक्षण देणार नाहीत असं हा दीडफुट्या आमदार म्हणत होता. हा दीड फुटाचा आमदार मुस्लिमांबद्दल वाईट बोलतोय. महागाई, बेरोजगारीवर बोल. पण नाही, हा जातीधर्माचं राजकारण करत आहे, असा घणाघाती हल्लाच मेहबूब शेख यांनी चढवला.

प्राजक्तदादांचा नाद करू नका

काही अधिकारी आता सत्तेच्या बाजूने झुकले आहेत. पण त्यांनी प्राजक्तदादांचा नाद करू नये. प्राजक्तदादा पहिल्याच टर्ममध्ये राज्यमंत्री झाले होते. प्राजक्तदादा हे जयंत पाटलांचे भाचे आहेत, हे लक्षात ठेवा, असा सूचक इशाराही त्यांनी अधिकाऱ्यांना दिला.

पाच वर्ष कशी गेली…

यावेळी प्राजक्त तनपुरे यांनीही जोरदार भाषण केलं. जयंत पाटील यांची यापूर्वी पाच वर्षांपूर्वी सभा झाली होती. पाच वर्षे कशी गेली हे कळलंही नाही. या पाच वर्षात मतदारसंघाचा विकास हे एकमेव लक्ष ठेवून काम केलं. पहिल्यांदा आमदार झाल्यावर राज्यमंत्री म्हणून काम करण्याची शरद पवार साहेबांनी संधी दिली. राहुरी तालुक्यातील अनेक गावांना पाणी देण्याचे काम जयंत पाटलांनी केले. तत्कालीन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील खूप मदत केली, असं प्राजक्त तनपुरे म्हणाले.

श्रेय फक्त जयंत पाटलांना

काही लोक म्हणायचे निळवंडेचे पाणी आणू शकलो नाही तर मते मागायला येणार नाही. मात्र महाविकास आघाडीचे सरकार असताना जयंत पाटील यांनी कालव्यांच्या कामांना 1200 कोटी दिले. राहुरी तालुक्यात निळवंडेचे पाणी आले, याचे श्रेय फक्त जयंत पाटलांना आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

दाजींचा विचार करा

महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर लाडक्या बहिणी प्रमाणेच लाडक्या दाजींचा ही विचार करा. लाडक्या दाजींना दिवसा वीज कशी मिळेल यावर निर्णय घ्या, असा चिमटा प्राजक्त तनपुरे यांनी महायुती सरकारला लगावला.