मुंबई : लोकसभा निवडणुकीला आता फक्त काही महिन्यांचा अवधी उरला आहे. पण त्याआधी राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडू शकतात. काही मोठे नेते पक्षांतर करुन सत्ताधाऱ्यांसोबत जाऊ शकतात. मागच्या चार वर्षातील महाराष्ट्राच राजकारण पाहिलं, तर काहीही होऊ शकतं. कधीही मोठ्या राजकीय घडामोडी घडू शकतात. सध्या मिलिंद देवरा चर्चेत आहेत. ते काँग्रेसची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश करु शकतात अशी चर्चा आहे. मिलिंद देवरा हे मुंबई काँग्रेसमधील एक मोठे नेते आहेत. त्यांच्या पक्ष बदलामुळे निश्चित काँग्रेसच मोठ नुकसान होईल. पण दक्षिण मुंबईतील सगळीच राजकीय गणित मोठ्या प्रमाणात बदलू शकतात. मिलिंद देवरा काँग्रेस सोडून शिंदे गटात जाणार ही चर्चा अशीच सुरु झालेली नाही. पडद्यामागे निश्चित काहीतरी घडतय. सध्या शिवसेनेत दोन गट पडले आहेत. शिंदे गट आणि ठाकरे गट.
ठाकरे गट महाविकास आघाडीसोबत आहे, तर शिंदे गट भाजपासोबत आहे. शिवसेना एकसंध होती, तेव्हा दक्षिण मुंबईची जागा महायुतीमध्ये शिवसेनेकडे होती. सध्या इथून ठाकरे गटाचे अरविंद सावंत खासदार आहेत. सहाजिकच 2024 लोकसभा निवडणुकीत दोन्ही गट आपपला उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवतील. शिंदेचा गट ही अधिकृत शिवसेना असल्याने ते दक्षिण मुंबईच्या जागेवर दावा करणार हे निश्चित. अशावेळी त्यांना एक दिग्गज उमेदवाराची गरज आहे. मिलिंद देवरा यांच्या रुपाने तो शोध पूर्ण होऊ शकतो.
मिलिंद देवरा निश्चित उजवे आहेत
दक्षिण मुंबईत मराठी वस्त्यांमध्ये ठाकरे गटाची ताकत आहे. गिरगाव, शिवडी, परळ, लालबाग, वरळी, काळचौकी या पट्ट्यात ठाकरे गट भक्कम आहे. अशावेळी शिंदे गटाने दक्षिण मुंबईच्या जागेवर दावा केला, तर त्यांना भक्कम उमेदवाराची गरज भासेल. मिलिंद देवरा निश्चित उजवे आहेत. राजकारणातील संस्कृत चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांनी लोकसभेवर दक्षिण मुंबईच प्रतिनिधीत्व सुद्धा केलं आहे. 2009 मध्ये त्यांनी दिवंगत शिवसेना माजी खासदार मोहन रावले यांचा पराभव केला होता. त्यानंतर 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकी अरविंद सावंत लोकसभेवर निवडून गेले.
दक्षिण मुंबईत कुठल्या पक्षाचे किती आमदार?
अरविंद सावंत यांनी निवडणूक जिंकली, तेव्हा शिवसेना-भाजपा युत्ती अभेद्य होती. पक्षात दोन गट पडले नव्हते, मोदी लाट होती, त्यामुळे सावंत यांचा विजय सहज साध्य झाला. पण आता चित्र बदललं आहे. दक्षिण मुंबईतील सहा विधानसभा मतदारसंघांवर नजर टाकली, तर वरळीतून आदित्य ठाकरे (आमदार ठाकरे गट), शिवडी अजय चौधरी (आमदार ठाकरे गट), भायखळा यामिनी जाधव (आमदार शिंदे गट), मलबार हिल मंगल प्रभात लोढा (आमदार भाजपा), कुलाबा राहुल नार्वेकर (आमदार भाजपा) आणि मुंबादेवी अमीन पटेल (आमदार काँग्रेस) असं बलाबल आहे. अशावेळी मिलिंद देवरा यांच्यासाठी काँग्रेससोडून शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवण फायद्याचच आहे. समस्या फक्त मराठी मतदार त्यांना कितपत स्वीकारतील हा मुद्दा आहे. मराठी पट्ट्यात अजूनही ठाकरे गटाशी एकनिष्ठ असलेला मतदार आहे. मनसेने इथे उमेदवार दिल्यास अजून समीकरण बदलू शकतात. मिलिंद देवरा यांच व्यक्तीमत्व एक जमेची बाजू आहे. त्यामुळे मराठी पट्टयातून त्यांना चांगलं मतदान होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.