नाशिक : दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर भाजप महाराष्ट्रात पुन्हा ‘मिशन कमळ’ राबवणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या ‘मिशन कमळ’वरुन अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. “भाजपला मिशन कमळ करु द्या, आमच्याकडे धनुष्यबाण आहे. किती वेळात बाण सोडावे यासाठी घड्याळ आणि हातही मजबूत आहेत”, असा चिमटा छगन भूजबळ यांनी काढला आहे (Minister Chhagan Bhujbal on BJP mission lotus ).
“105 आमदार जिंकून येऊनही सत्तेपासून दूर राहावं लागल्याचं दु:ख भाजप नेत्यांच्या बोलण्यातून दिसून येत आहे. तसंही राजकारणात गोळाबेरीज रातोरात जुळवता येते हे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ घेऊन दाखवलंच आहे. आता दिल्लीच्या निवडणुकीचा निकाल 11 तारखेला लागणार आहे. त्यामुळे कोणतं राजकीय ऑपरेशन होणार? आणि कोण कोणाचं ऑपरेशन करणार? हे लवकरच दिसेल”, असा टोला छगन भुजबळ (Minister Chhagan Bhujbal on BJP mission lotus) यांनी भाजपला लगावला.
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन आता तीन महिने होत आले. विधानसभा निवडणुकीत भाजपला राज्यात सर्वाधिक जागांवर यश मिळालं तरी विरोधी बाकावर बसावं लागलं. आता सत्ता मिळावी यासाठी भाजप कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातही ‘मिशन कमळ’ राबवणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. याशिवाय सत्ता स्थापन करण्यास शिवसेनेचा प्रस्ताव आल्यास भाजप तयार असल्याचंही भाजप नेते बोलत आहेत. मात्र, ते सहजासहजी होणं शक्य नाही. दरम्यान, राजकीय वर्तुळात सुरु असलेल्या भाजपच्या ‘मिशन कमळ’च्या चर्चांवरुन छगन भुजबळ यांनी भाजपवर टीका केली.
याशिवाय अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी “भाजपला दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर मोठं खिंडार पडणार”, असा दावा केला आहे. “विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षातून भाजपात गेलेले सर्व नेते आता स्वगृही परतणार आहेत”, असे मलिक म्हणाले आहेत. त्यामुळे दिल्लीच्या निवडणुकीनंतर नेमकं कोणाचं ‘राजकीय ऑपरेशन’ होणार? आणि भाजप 144 हा मॅजिक आकडा दाखवून सत्ता स्थापनेचा दावा करत ‘मिशन कमळ’ यशस्वी करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.