Dhananjay Munde CM Devendra Fadnavis Meet : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्येमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. या घटनेने बीड जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. या घटनेवरुन राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले जात आहे. मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचे असणारे वाल्मिक कराड हे यामागचे खरे सूत्रधार असल्याचा आरोप संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आणि गावकऱ्यांकडून केला जात आहे. आता याप्रकरणी धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
धनंजय मुंडे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेतली. या भेटीनंतर धनंजय मुंडे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी संतोष देशमुख हा माझ्या जिल्ह्यातील एक सरपंच आहे. मलाही त्याच्या बाबतीत तितकाच आदर आहे. जे कोणी यात गुन्हेगार आहे, त्या सर्वांना फाशीची शिक्षा करा, मग ते कोणीही असो, असे वक्तव्य केले.
“मुख्यमंत्र्यांची भेट योगायोगाने झाली. बीडमध्ये संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या झाली ही हत्या ज्याने कोणी केली, त्याच्यावर कारवाई व्हायला हवी. त्याला फाशी व्हायला पाहिजे, या मताचा मी आहे. संतोष देशमुख हा माझ्या जिल्ह्यातील एक सरपंच आहे. मलाही त्याच्या बाबतीत तितकाच आदर आहे. जे कोणी यात गुन्हेगार आहे, त्या सर्वांना फाशीची शिक्षा करा, मग ते कोणीही असो. कुणाच्याही कितीही जवळचं असो, मग तो माझ्याही जवळच असो. त्यालाही सोडायचा नाही”, असे धनंजय मुंडे म्हणाले.
“पण फक्त राजकारणासाठी माझ्यावर आरोप करणं, याच्यामागे काय राजकारण असू शकतं, हे आपण समजू शकता. वाल्मिक कराड यांची जवळीक सुरेश धस यांच्यासोबत होती. ते माझ्याही जवळचे आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्याची चौकशी सुरु आहे. ही चौकशी पारदर्शकपणे व्हायला पाहिजे मी देखील या मताचा आहे. पण माझ्याविरोधात सकाळी सकाळी बोलल्याशिवाय जर तुमचा दिवस उजडत नसेल, तर त्यासाठी आपण काहीही करु शकत नाही”, असे धनंजय मुंडेंनी म्हटले.
“मिडिया ट्रायलमध्ये माझं नाव खराब करण्यासाठी मंत्रिपदाची शपथ घ्यायच्या आधीपासून, मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर, विभाग कोणता मिळावा, कोणता मिळू नये यासाठी आणि त्यानंतर बीडचं पालकमंत्रीपद कोणी घ्यावं, कुणी घेऊ नये हा सर्व विषय मी माझ्या पक्षाचे नेतृत्व अजित पवारांकडे दिला आहे. या प्रकरणाची चौकशी गतीने सुरु आहे. लवकरात लवकर ही चौकशी व्हावी. इतकंच नव्हे तर हे प्रकरण फार भयंकर आहे. त्यामुळे याचा खटला फास्ट ट्रक कोर्टात चालावा. चार्जशीट लवकर दाखल व्हायला हवी. याप्रकरणी ज्या गोष्टी निष्पन्न होतात, त्या कोर्टात लगेचच समोर आल्या पाहिजेत”, असेही धनंजय मुंडे म्हणाले.
“मला समाजकारणातून आणि राजकारणातून उठवणे हा यामागचा उद्देश असू शकतो. यामागची वस्तुस्थिती जी काही असेल ती मी आधीच सांगितली आहे. त्यामुळे यामागे जो कोणी असेल त्याला सोडायचं नाही. याप्रकरणी जो कोणी आरोपी आहे, त्यालाही फाशी दिली पाहिजे, मी या मताचा आहे”, असे धनंजय मुंडे म्हणाले.