जळगाव : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackery) यांची उद्या जळगावतील पाचोऱ्यात उद्या भव्य सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) पूर्वतयारीसाठी जळगावात गेले आहेत. या दरम्यान जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) आणि संजय राऊत यांच्यात वाकयुद्ध रंगलेलं बघायला मिळतंय. संजय राऊतांनी जळगावात दाखल होताच जळगावात घुसलं अशा दोन शब्दांची प्रतिक्रिया देत गुलाबराव पाटील यांना डिवचलं. त्यानंतर दोन्ही बाजूने टीका-टीप्पणी सुरु आहेत. विशेष म्हणजे गुलाबराव पाटील यांनी यावेळी संजय राऊत यांना मोठा इशारा दिला आहे.
“उद्धव ठाकरे यांच्या सभेला कुणीही विरोध केलेला नाही. आर ओ तात्यांच्या पुतळ्याच्या कार्यक्रमाला कुणीही विरोध केलेला नाही. आर ओ तात्या आमचे जीवलग मित्र होते. ते आमच्या प्रत्येक सुख-दु:खात येणारे होते. त्यांच्या पुतळाच्या कार्यक्रमादरम्यान संजय राऊत नेहमी वेगळं वक्तव्य करत आहेत. आमचा त्यांना विरोध आहे. ते आजही गुलाबी गँग बोलले. त्यांना सगळं बोलायची मुभा आहे का?”, असा सवाल गुलाबराव पाटील यांनी केला.
“माझ्या माहितीप्रमाणे हे जे नतद्रष्ट लोकं आहेत, ज्यांनी शिवसेनेची वाट लावली त्यांना आमचा विरोध आहे. ते म्हणाले मी जळगावात पाय ठेवला. रेल्वे स्टेशनवर दिसलं ना काय झालं, संजय राऊतांना दिसलं तिथे काय झालं ते, एकही कार्यकर्ता येऊ देणार नाही आणि आले तर जाऊ देणार नाही असं बोलत होते. अहो रेल्वे स्थानकावर कार्यकर्ते येऊन गेले. ते आले आणि वापस गेलेही. आम्हाला या आयडिया शिकवू नये. राऊत कोणत्याच आंदोलनात नव्हते. शिवसेनेचं आंदोलन कसं करावं हे त्यांना माहिती नाही. आम्ही दगडं मारुन लोकांच्या सभा बंद करणारे लोकं आहोत. त्यामुळे राऊतांनी आम्हाला चॅलेंज करु नये”, असा मोठा इशारा गुलाबराव पाटील यांनी दिला.
“आमच्या मतांवर खासदार झालेला, याची आम्हाला काय भीती? एवढा दम आहे तर खासदारकीचा राजीनामा द्यावा. पुन्हा खासदार होऊन दाखवा. आमची मतं घ्यायची, खासदार व्हायचं, पुन्हा आम्हालाच काहीही बोलायचं का? कोणत्या गणितात हे बसतं? आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहोत. त्यांनी आम्हाला अक्कल शिकवू नये”, अशी टीका गुलाबराव पाटील यांनी केली.