सातारा : कृषी उत्पन्न बाजार समितींच्या निवडणुकांमध्ये (Maharashtra APMC Election 2023) वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये कोण बाजी मारेल, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं होतं. अनेक बड्या नेत्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली होती. यामध्ये शिंदे गटाच्या बड्या नेत्यांकडे संपूर्ण राज्याचं लागलेलं होतं. कारण राज्यात गेल्या दहा महिन्यांमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडल्या. या घडामोडींनंतर सर्वसामान्यांची नेमकी काय भूमिका आहे हे जाणून घेण्यासाठी ही निवडणूक जास्त आवश्यक मानली जात होती. अखेर या निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाले आहेत.
साताऱ्यात या निवडणुकीचा धक्कादायक असा निकाल लागला आहे. साताऱ्यातील पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीवर गेल्या चार दशकांपासून म्हणजे 40 वर्षांपासूनचं राष्ट्रवादीचं वर्चस्व उधळून लावण्यात मंत्री शंभूराज देसाई यांना मोठं यश आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांच्या गेल्या चार दशकांपासून पाटण बाजार समितीवर वर्चस्वर होतं. पण हे वर्चस्व आपल्या गटाकडे खेचून आणण्यात मंत्री शंभूराज देसाई यांना यश आलंय. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
शंभूराज देसाई हे राज्याचे उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री आहेत. त्यांनी गेल्या 10 महिन्यांमध्ये उत्पादन शुल्क विभागाची जबाबदारी हाती घेतल्यानंतर तिथेही चांगलेच यश आलं आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या महसूलमध्ये वाढ झालीय. आपल्या विभागाच्या मंत्रिपदाच्या कारभाराची जबाबदारी चोखपणे पार पाडत असतानाच शंभूराज देसाई हे आपल्या मतदारसंघातही यशस्वी होताना दिसत आहेत.
शंभूराज देसाई यांच्या पॅनलचे ग्रामपंचायत मतदारसंघातील चार उमेदवार हे 225 मतांच्या फरकाने निवडून आले आहेत. बाजार समितीत वर्षोनुवर्षे सत्यजितसिंह पाटणकर यांच्या गटाची सत्ता होती. त्यामुळे बाजार समितीवर सत्ता परिवर्तन करणं किंवा पाटणकर गटाचा पराभव करणं हे खूप आव्हानात्मक होतं. पण आव्हानांना सामोरं जात शंभूराज देसाई यांच्या पॅनलचे जोतीराम काळे, समीर भोसले, सिद्धार्थ गायकवाड आणि सुधाकर देसाई विजयी झाले आहेत.
पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 17 जागांसाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीसाठी 34 उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीची चुरस वाढली होती. कारण दोन्ही बाजूला ताकदान नेते होते. पण अथेर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी बाजी मांडली. या विजयानंतर शिंदे गटाच्या शिवसेनेकडून पाटणमध्ये चांगलाच जल्लोष करण्यात आला. शंभूराज देसाई यांचा विजय हा ऐतिहासिक मानला जातोय. त्यामुळे कार्यकर्त्यांकमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे.