मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) काही आमदारांसह भाजप आणि शिवसेनेसोबत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या चर्चांदरम्यान उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांचं एक मोठं विधान समोर आलं आहे. “अजित पवार भाजपसोबत येणार असतील तर त्यांचं स्वागतच आहे. अजित पवार भाजपसोबत आले तर पॉलिटिकल करेक्ट कार्यक्रम-2 होईल”, असं उदय सामंत म्हणाले. तसेच “अजित पवार शिंदे-भाजपसोबत काम करण्याचा निर्णय घेत असतील तर त्यांचं स्वागत आहे”, असंही ते म्हणाले आहेत.
“अजित दादा यांच्या वागण्याची वेगळी स्टाईल आहे. त्यांची काम करण्याची वेगळी स्टाईल आहे. अशी व्यक्ती जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्याबरोबर येणार असेल तर आम्हाला मनापासून आनंद आहे. पॉलिटीकल करेक्ट कार्यक्रम-2 करायचा असेल तर त्यामध्ये एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना पुढाकार घ्यावा लागेल. अजित दादा भाजप आणि शिंदे यांच्याबरोबर काम करण्याचा निर्णय घेत असतील तर त्यांचं स्वागत आहे”, असं उदय सामंत म्हणाले आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन आमदारांनी जाहीरपणे अजित पवार यांना पाठिंबा दर्शवला आहे. अजित पवार जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य आहे. अजित पवार जिथे जातील तिथे आम्ही जाऊ. विधानसभेत अजित पवार यांच्या इतका ताकदवार नेता नाही. तेच राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते आहेत, अशी भूमिका या दोन्ही आमदारांनी जाहीरपणे घेतली आहे. त्यामुळे राजकारणातील घडामोडी आणखी कोणत्या दिशेला जाणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी विधानसभाचे आमदार अण्णा बनसोडे आणि सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी जाहीरपणे अजित पवार यांना पाठिंबा दर्शवला आहे. विशेष म्हणजे अण्णा बनसोडे मुंबईला रवाना झाले आहेत. अजित पवार यांनी आपल्याला मुंबईला बोलवलं असल्याचा दावा त्यांनी केलाय. बनसोडे हे अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून मानले जातात. अजित दादा जिथे जातील, तिथे मी जाणार, असं जाहीरपणे बनसोडे ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बोलताना म्हणाले आहेत.
सिन्ररचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी आज पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली. “अजित पवारांशी 20 मिनिटं शेतकऱ्यांच्या विषयावर चर्चा केली. त्यानंतर मी विचारलं काय चाललंय सगळं? आम्ही पक्षाचे आमदार आहोत. पक्ष घेईल तो निर्णय आम्हाला मान्य आहे. आम्ही पक्षासोबत आहोत. राज्यात सध्या अस्थिर परिस्थिती आहे. राष्ट्रवादीला सोबत घेणं एवढा एकच पर्याय सध्या भाजपकडे आहे”, असं माणिकराव कोकाटे म्हणाले.
“भाजपसोबत गेल्यास राष्ट्रवादीला फायदा होईल की नाही माहिती नाही, मात्र भाजपाला फायदा होईल. भाजप केंद्रात सत्तेत येईल. आता आमचे आमदार अस्वस्थ आहेत हे नक्की आहे. अजित दादा भाजपसोबत जाणार असतील तर आम्ही पक्षासोबत आणि दादासोबत जाणार. कोर्टाचा निर्णय येत नाही, तोपर्यंत राष्ट्रवादी काही निर्णय घेईल, असं वाटत नाही. राजकारणात परिस्थितीनुसार निर्णय घ्यायचे असतात”, असं सूचक विधान माणिकराव कोकाटे यांनी केलं.
या सगळ्या घडामोडी एकीकडे घडत असताना अजित पवार यांनी उद्या मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक बोलावल्याची बातमी समोर आली होती. यावर अजित पवार यांनी स्वत: ट्विट करत माहिती दिली आहे. “सोमवारी माझा कोणताही नियोजित कार्यक्रम नव्हता. मी मुंबईतच आहे. उद्या, मंगळवार दि. १८ एप्रिल २०२३ रोजी मी विधानभवनातील माझ्या कार्यालयात उपस्थित राहणार असून कार्यालयाचे नियमित कामकाज सुरु राहणार आहे. मंगळवारी मी आमदारांची बैठक बोलावल्याच्या बातम्या काही माध्यमातून प्रसिद्ध होत आहेत, त्या पूर्णत: असत्य आहेत. मी आमदार अथवा पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली नाही, याची नोंद घ्यावी”, असं पवार ट्विटरवर म्हणाले आहेत.